आखाडा बाळापूर : टँकरचे पाणी पुरेना, पाणी घेण्यासाठी पायपीट बंद होईना | पुढारी

आखाडा बाळापूर : टँकरचे पाणी पुरेना, पाणी घेण्यासाठी पायपीट बंद होईना

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिन्यापासून प्रशासनामार्फत आखाडा बाळापूर शहरला चार टँकरद्वारे आठ फेऱ्या म्हणजे एक लाख लिटर पाणी दररोज मिळते. पण, शहराला १४ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असल्याने शहरवासीयांची पाण्यावाचून पायपीट आणखी थांबत नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही, पाण्याची व्यवस्था करण्यात प्रशासन व ग्रामपंचायत सूत्राला सपशेल अपयश आल्याचे दिसते.

२५ गाव मोरवाडी ईसापूर धरणातून होणारा आखाडा बाळापूर शहराला पाणीपुरवठा विजेचे बिल थकबाकी झाल्याने विद्युत कनेक्शन तोडण्यात आले. त्या मार्च महिन्यापासून शहरवासीयांना अत्यल्प पाणी मिळत आहे. आठ ते पंधरा दिवसाला एकवेळ नळ योजनेचं पाणी थोड्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. प्रशासनामार्फत आखाडा बाळापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी तीन बोर अधिग्रहण करण्यात आले आहेत.

विहिरीवरून रोज चार टँकरने आठ फेऱ्या पाणी आणण्यात येत आहे. त्यामध्ये हे पाणी एक लाख लिटर गावातील जलकुंभमध्ये टाकण्यात येते. ते पाणी शहराला नळाद्वारे सोडण्यात येत आहे. शहराला रोज १४ लाख लिटर पाण्याची गरज असताना केवळ दररोज एक लाख लिटर पाणी मिळत असल्याने पाण्यावाचून शहरवासीयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

डोंगरगाव पुल येथे नव्याने विहिरीचे काम होत आहे. तोपर्यंत शहराला अत्यल्प पाणीपुरवठा मिळत आहे. विहीर झाल्यानंतरही शरीराला भरपूर पाणी मिळेल असे संकेत नाहीत. विद्युत पुरवठ्याचे बिल कोट्यवधी रुपयांच्या रकमेत थकले असल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ईसापूर धरणातून होणारा पाणीपुरवठा २५ गाव मोरवाडी योजनेद्वारे आखाडा बाळापूरसह इतर गावांना होत होता. आताही २५ गाव मोरवाडी नवीन योजना बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांचे झालेले नळ योजनेचे काम बंद पडणार असल्याने या  योजनेला अखेरची घरघर लागल्याचे दिसते.

२५ गाव मोरवाडी नळ योजनेशिवाय भरपूर पाणीपुरवठा होऊ शकत नाही, हे ग्रामपंचायत प्रशासनाच्याही लक्षात आहे. सध्या मात्र बाळापूरवासियांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे सामान्य कुटुंबे विकतचे पाणी घेत असताना मेटाकुटीला आले आहेत. उन्हाळा असल्याने गावातील प्रत्येक कुटुंबाचे बोर जवळपास पाणीपातळी खोल गेल्याने आटले आहेत.

हेही वाचा :

Back to top button