पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नावची बनावट नियुक्ती पत्रे घेत नोकरीवर रुजू होण्यासाठी आलेल्या एकावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बारामती व इंदापूर तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हे उमेदवार बनावट नियुक्ती पत्रे घेवून पोहोचले होते.
त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आकाश सोमनाथ सोनवणे (रा. खडकी गावठाण, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी फसवणूकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी ज्ञानदीप मारुती राजगे यांनी याबाबत फिर्याद दिली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. २० रोजी दुपारी चार वाजता होळ (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. सोनवणे याने होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिपरिचारक म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांचे खोट्या सहीचा बनावट आदेश तयार करून तो खरा असल्याचे भासवत शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तो शासकिय कामात वापर केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान होळ सह सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही याच दिवशी श्रीनाथ मधुकर बंडगर (रा. वीरवाडी, नं. २, मदनवाडी) असे नाव व पत्ताअसलेली व्यक्ति नियुक्ती आदेशाचे पत्र घेवून आली होती. सांगवीचे आरोग्य अधिकारी डाॅ. जनार्दन सोरटे यांनी त्यास पंचायत समितीच्या आरोग्य विभागात जाण्यास सांगितले. परंतु पंचायत समितीच्या आरोग्य विभागात मात्र कोणीही पोहोचले नाही. या दोन्ही ठिकाणी बनावट नियुक्ती पत्रे घेवून काही व्यक्ति रुजू होण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी सांगितले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरु झाली.