हिंगोली : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोक्यात लाकूड घालून खून | पुढारी

हिंगोली : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोक्यात लाकूड घालून खून

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा डोक्यात लाकूड घालून खून केला. देवानंद संतोष मुधोळ (वय २०) असे या खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी ( दि.२२ ) सकाळी घडली.

संतोष मुधाेळ यांचे गावापासून काही अंतरावर १२ एकर शेत आहे. संतोष यांचा मुलगा देवानंद शनिवारी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. आज सकाळी तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना देवानंद याचा मृतदेह बाजेवर आढळला.  त्‍याच्‍या कुटुंबियांनी शेतात धाव घेतली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आमदार संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, माजी सभापती फकीरराव मुंडे यांनी शेतात जाऊन पाहणी केली.

देवानंद याच्‍या डोक्यात लाकडाने मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या.लाकूड बाजेच्या बाजूला आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, कळमनुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळमनुरी पोलिसांनी सांगितले. मयत देवानंद मुधोळ याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वानाने काही अंतरावर असलेल्या रस्त्यापर्यंत माग काढला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button