चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बोटेझरी कॅम्पमधील 6 हत्ती गुजरातला रवाना | पुढारी

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बोटेझरी कॅम्पमधील 6 हत्ती गुजरातला रवाना

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १३ हत्ती गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर आज शुक्रवारी (19 मे)  ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी कॅम्पमधील एकूण 6 हत्तींना गुजरातला हलविण्यात आले आहे. नागपूर मार्गे हत्तींना घेऊन जाणारे ट्रक हे रवाना झाले आहेत. सहामध्ये 4 नर व 2 मादी हत्तींचा समावेश आहे. या हत्तींची कमतरता भरून काढण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाद्वारे कर्नाटक राज्यातून प्रशिक्षीत हत्ती आणून सुसज्ज हत्ती पथक तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी कॅम्पमधील खूप वर्षांपासून हत्ती वास्तव्यास होते. परंतु सदर हत्ती एकाच वंशावळीचे असल्याने त्यांच्या संततीमध्ये गंभीर स्वरूपाचे दोष उदभवण्याची शक्यता होती.

त्यामुळे राज्य शासनाने हत्तींच्या पुढील जिवनकाळातील योग्य स्वास्थ व उच्च दर्जाच्या वैद्यकीय देखरेखीसाठी प्रशिक्षीत व अनुभवी वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत योग्य उपचाराची सोय होणे गरजेचे आहे. उत्तम आधुनिक सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रशस्त जागा असलेल्या गुजरातमधील जामनगर स्थित राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 6 हत्तींना स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रोजेक्ट एलीफंट विभाग व केंद्रीय प्राणीसंग्रहालय, मंत्रालय, पर्यावरण, वने आणि हवामान बदल, भारत सरकार यांचेकडून “नाहरकत” मिळालेली आहे. तसेच मुख्य वन्यजीव रक्षक, गुजरात सरकारकडून सुध्दा हत्तींचे स्थलांतरण करण्याबाबत नाहरकत मिळाली आहे. तसेच राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट जामनगर, गुजरात यांनी शुध्दा सर्व हत्तींचे आजीवन देखभाल करण्याकरीता सहमती दिली आहे.

त्यामुळे ताडोबातील 6 हत्तींना स्थलांतरीत करण्यासाठी राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट यांचेकडून पशुवैद्यकीय अधिकारी व चमू चंद्रपूर येथे पोहचले. आज शुक्रवारी (19 मे) ला सकाळी 6 वाजताचे सुमारास ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी हत्ती कॅम्पमधून नागपूर मार्गे अहमदाबाद जामनगर येथे स्थलांतरीत करण्यासाठी रवाना करण्यात आले. या हत्तींची कमतरता भरून काढण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाद्वारे कर्नाटक राज्यातून प्रशिक्षीत हत्ती आणून सुसज्ज हत्ती पथक तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

हेही वाचा

Back to top button