पुणे : चासकमान जलाशयात बुडून सह्याद्री स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू | पुढारी

पुणे : चासकमान जलाशयात बुडून सह्याद्री स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

राजगुरुनगर/वाडा : पुढारी वृत्तसेवा

गुंडाळवाडी (ता. खेड) येथे चासकमान धरणाच्या जलाशयात सह्याद्री स्कूलचे पोहायला गेलेले ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १९) दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडल्याचे समोर आले. यामध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

गुंडाळवाडी येथील तिवई हिल येथे सह्याद्री स्कूल असून येथे निवासी विद्यार्थी आहेत. शुक्रवार (दि. २०) पासून शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विद्यार्थी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी व पोहण्याचा सराव करण्यासाठी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चासकमान धरणाच्या जलाशयात गेले होते. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, काही विद्यार्थी कंबरेएवढ्या पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आल्याने या लाटेत ६ ते ७ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या वेळी शिक्षकांनी तातडीने मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. यातील काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी तीरावर आणले; मात्र त्यातील ४ विद्यार्थी लाटेबरोबर खोल पाण्यात बुडाले. यामध्ये परीक्षित अग्रवाल, रितीन डीडी हि २ मुले तर तनिशा देसाई व नव्या भोसले या विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहित कळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व रात्री उशिरापर्यत सर्व चारही मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले. याबाबत खेडचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यासह त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

हेही वाचा

Back to top button