चंद्रपूर : दारु दुकानांच्या विरोधात नागरिकांची उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक | पुढारी

चंद्रपूर : दारु दुकानांच्या विरोधात नागरिकांची उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील जगन्नाथ बाबा मठ, डॉ. राम भारत बाल रुग्णालयाच्या शेजारी लावण्यात आलेले देशी दारू दुकान व जैन भवन जवळील बिअर शॉपी वाईन शॉपीसह शहरात अनधिकृतरित्या स्थलांतरीत करण्यात आलेले दारु दुकान, वाईन व बिअर शॉपला तातडीने स्थगिती देण्यात यावी या मागणीकरीता नागरिकांनी उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक मारली. जगन्नाथबाबा मठ परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी काल बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात धडक मोठ्या संख्येनी धडक दिली. यावेळी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला असताना नागरिक उत्पादन शुल्क कार्यालयात पोहचले आणि दारू दुकान व वॉईन शॉपीला स्थगिती देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

दारूबंदी प्रतिबंधक कायदा १९४९ मधील कलम ड (५) नुसार देशी दारू दुकान, वाईन शॉप, परमिट रूम, बिअर शॉपी यांची मंजुरी किंवा स्थानांतरणाकरिता महानगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून दुकानाचे किंवा इमारतीचे बांधकाम अधिकृत असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील कोणत्याही दुकानाकरिता मनपाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून दाखला घेतलेला नसल्याचे मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील यांना लिहिलेल्या पत्रातून उघडकीस आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील सर्व देशी दारू दुकानांचे स्थानांतरण, बिअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूमची मंजुरी नियमबाह्य असल्याने सर्व दुकानांना तातडीने स्थगिती देण्याची मागणी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केली आहे.

चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील जगन्नाथ बाबा मठ, डॉ. राम भारत बाल रुग्णालयाच्या शेजारी देशी दारू दुकान व जैन भवन जवळ बिअर शॉपी वाईन शॉपीचे स्थानांतरण करण्यात आले आहे. या दुकानांना हटविण्याकरिता जगन्नाथबाबा परिसरातील महिला व पुरूषांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे काल बुधवारी नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोठ्या संख्येने महिला व पुरूषांनी एकत्र येऊन धडक दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी दारू दुकान स्थानांतरीत करण्याबाबत दिलेल्या अहवालांची उच्चस्तरीय चौकशी करा. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पप्पू देशमुख यांनी या प्रसंगी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी कार्यालयाच्या बाहेर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आंदोलनकर्ते महिला मनीषा बोबडे, अरुणा महातळे, मेघा दखणे, माया बोढे, आशु कष्टी, करूणा तायडे, सुचिता ढेंगळे, मेघा मगरे, कविता अवथनकर, रमा देशमुख, बेबीताई राठोड़, वच्छला पंधरे, शोभा तोडासे, निलीमा लोणारे, वैशाली मानकर, रेखा गिरडकर, शिला बिरमवार आदींसह शेकडोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

सुरक्षा यंत्रणेला भेदून उत्पादन कार्यालयात प्रवेश

चंद्रपूर शहरातील दारु दुकानाविरोधात नागरिक संतप्त आहेत. नवनवे आंदोलन करून नागरिक प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. काल बुधवारी जगन्नाथबाबा मठ परिसरातील नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयाचे बाहेरील प्रवेशद्वार आतून बंद केले होते. त्यामुळे सर्व आंदोलक रस्त्यावर उभे होते. मात्र संधी साधून जन विकास सेनेच्या मनीषा बोबडे यांनी आक्रमक होऊन पोलिसांना न जुमानता सहकाऱ्यांसह उत्पादन शुल्क कार्यालयात प्रवेश केला. आणि थेट उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून आंदोलन सुरू केले. काही वेळ आंदोलकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आवारातच ठिय्या मांडला.

Back to top button