कोल्हापूर : अंतिम प्रारूप प्रभाग रचना उद्या प्रसिद्ध | पुढारी

कोल्हापूर : अंतिम प्रारूप प्रभाग रचना उद्या प्रसिद्ध

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी (दि. 13) प्रसिद्ध होणार आहे. मनपा अधिकार्‍यांनी बुधवारी मुंबईत राज्य निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती सादर केली. त्यानंतर आयोगाच्या अधिकार्‍यांनी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. गॅझेटमध्ये प्रारूप प्रभाग दुपारी प्रसिद्ध झाल्यानंतर ताराबाई पार्कातील महापालिका निवडणूक कार्यालयासह चारही विभागीय कार्यालयांत त्याचे आराखडे पाहण्यास उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयागाने 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, महापालिका प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये प्रारूप प्रभाग रचना आयोगाला सादर केली आहे. तसेच त्यावर आलेल्या 115 हरकतींचा अहवालही 4 मार्चला दिला आहे. प्रारूप प्रभाग रचनेची सर्व प्रक्रिया महापालिकेने पूर्ण केली आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. काही हरकतींची दखल आयोगाने घेतली असून, सहा ते आठ प्रभागांच्या रचनेत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येनुसार 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रत्येकी 3 नगरसेवकांचा एक यानुसार 30 प्रभाग आणि 2 नगरसेवकांचा 1 असे एकूण 31 प्रभाग असतील. सुमारे सहा लाख लोकसंख्या गृहीत धरून 31 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. एका प्रभागातील लोकसंख्या सुमारे 18 ते 20 हजार असणार आहे. त्यातील मतदारांची संख्या सुमारे 15 ते 16 हजार असेल.

Back to top button