थरार! धाडसानं आई काठी घेऊन धावली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची केली सुटका | पुढारी

थरार! धाडसानं आई काठी घेऊन धावली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची केली सुटका

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा; चंद्रपूर महानगराला लागून असलेल्या दुर्गापूर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. बिबट्याने गावात येवून अंगणातील व्यक्तींवर हल्ला करून ठार केले आहे. तर घराशेजारी आढळून आलेल्यांना थेट उचलून नेत त्यांचा जीव घेतल्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत. काल मंगळवारी (१० मे) रात्री नऊच्या सुमारास अशीच एक घटना दुर्गापूर येथे घडली. एका तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करत तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु चिमुकलीच्या आईने धावून येत काठीने बिबट्याला पळवून लावले. यामुळे मुलीचा जीव वाचला.

चंद्रपूर महानगराला लागून दूर्गापूर आहे. येथे जगजीवन पोप्पलवार हे रहिवासी आहेत. त्यांना ३ वर्षाची आरक्षा नावाची मुलगी आहे. काल मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अंगणात ही चिमुकली खेळत होती. दरम्यान, त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याची नजर तिच्यावर पडली. तिच्यावर हल्ला करीत तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आईचे तिच्यावर लक्ष असल्याने सदर बिबट्याचा थरार क्षणात तिच्या लक्षात आला. क्षणाचाही विलंब न लावता आई काठी घेऊन बिबट्यावर तुटून पडली. बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या चिमुकलीला सोडविले. या घटनेने एकच कल्लोळ आणि आरडाओरड झाली. घरातील. शेजारील धावून आल्याने बिबट्या घाबरला. अखेर त्या चिमुकलीला सोडून बिबट्याला पळ काढावा लागला. आईने बिबट्यासोबत झूंज दिली नसती तर आईला चिमुकलीपासून पोरके व्हावे लागले असते. आरक्षा जगजीवन पोप्पलवार असे तिचे नाव आहे.

आरक्षा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. तिला लगेच उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिमुकली आरक्षाची आई मुलीची ढाल बनून धावून आल्याने तिचा जीव वाचला आहे. आईच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरलेल्या वनविभागाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

Back to top button