महाविकास आघाडीत बिघाडी ! राष्ट्रवादीची थेट भाजपला साथ, कॉंग्रेस सत्तेपासून दूर | पुढारी

महाविकास आघाडीत बिघाडी ! राष्ट्रवादीची थेट भाजपला साथ, कॉंग्रेस सत्तेपासून दूर

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा याच आघाडीचा फॉर्म्युला राहील, अशी अपेक्षा होती. परंतु, भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत शुक्रवारी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची संधी असताना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करुन सत्ता काबीज केल.

जिल्ह्यातील लाखनी आणि साकोली या दोनच पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले, तर तुमसरमध्ये उपसभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आले. आघाडीबाबत काँग्रेस नेत्यांनी हेकेखोर भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी भाजपशी युती केल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

डिसेंबर २०२१ आणि जानेवारी महिन्यात पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर ६ मे रोजी सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. भंडारा पंचायत समितीत भाजप ७, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ४, अपक्ष २, शिवसेना १ असे संख्याबळ आहे. परंतु, याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सोबत घेतले. सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस तर उपसभापती पद भाजपच्या वाट्याला आले आहे. पवनीत काँग्रेसला सर्वाधिक जागा असताना राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. याठिकाणी सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपसभापती पद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे.

तुमसरमध्ये भाजपने काँग्रेससोबत मिळून सभापतीपद आपल्याकडे ठेवले असून उपसभापतीपद काँग्रेसला दिले आहे. लाखांदूरात राष्ट्रवादीचे फक्त दोनच सदस्य असताना ५ सदस्य असलेल्या काँग्रेसला बाजूला सारत राष्ट्रवादीने भाजपचा पाठिंबा मिळविला. याठिकाणी सभापती आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीने आपलेकडे ठेवले. मोहाडीत भाजपला स्पष्ट बहुमत असले, तरी अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातील उमेदवारच नव्हते. परिणामी राष्ट्रवादीकडे सभापतीपद आले. तर उपसभापतीपद भाजपने प्राप्त केले. लाखनीत काँग्रेसच्या वाट्याला सभापतीपद तर भाजपला उपसभापतीपद मिळाले. साकोलीमध्ये बहुमत असलेल्या काँग्रेसला एकतर्फी सत्ता प्राप्त करता आली.

काँग्रेसचे दुर्लक्ष कारणीभूत

आज झालेल्या निवडणुकीत विविध राजकीय समीकरण समोर आल्याने अनेक ठिकाणी संधी असूनही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले. ही युती स्थानिक नेत्यांनी त्या त्या पंचायत समितीतील परिस्थिती पाहून केली असल्याचा दावा केला जात आहे. तरी यामागे काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आघाडीबाबत काँग्रेसच्या नेत्यांशी अनेकदा चर्चा करण्यात आली. परंतु, काँग्रेसकडून कधीच सकारात्मक दुजोरा दिला गेला नाही. त्यामुळे दुखावल्या गेलेल्या राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेत काय होणार ?

१० मेरोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला आजच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची किनार राहणार आहे. पंचायत समितीतील युतीचा फार्मुला जिल्हा परिषदेत कायम राहीला. तर सर्वात मोठा पक्ष ठरूनही जिल्हा परिषदेत काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावे लागले, तर नवल वाटू नये.

राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म मोडला – काँग्रेस

आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनेकदा चर्चा झाली. परंतु, राष्ट्रवादीकडून नेहमीच मोघम उत्तर देण्यात आले. आजच्या समीकरणातून राष्ट्रवादीने काँग्रेसला टाळण्याचा प्रयत्न केला असून आघाडीचा धर्म मोडला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिली. पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भूमिका ठरवू, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button