बच्चू कडूंना न्यायालयाचा दिलासा, ९ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश | पुढारी

बच्चू कडूंना न्यायालयाचा दिलासा, ९ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

अकोला: पुढारी वृत्तसेवा: रस्त्यांच्या कामातील अपहारप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल असलेले राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने ९ मेपर्यंत बच्चू कडूंना अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

बच्चू कडू यांच्यावर स्थानिक सिटी कोतवाली पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. धैयवर्धन पुंडकर यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ नुसार २७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बच्चू कडूंनी गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर न्यायाधिशांनी सुनावणी देत ९ मेपर्यंत बच्चू कडूंना अटक न करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत.

यामुळे बच्चू कडू यांच्यावरील अटकेचे संकट काही दिवस तरी टळले आहे. पुढे सिटी कोतवाली पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करुन कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे सिटी कोतवाली पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ना. बच्चू कडू विरुद्ध फसवणूकीचे गुन्हे दाखल केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button