सातारा : संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदली करा - मदन भोसले | पुढारी

सातारा : संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदली करा - मदन भोसले

 भुईंज : पुढारी वृत्तसेवा
ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी शेतकर्‍यांना जादा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून एसएमपी आणि नंतर एफआरपीपेक्षा 400 कोटी रुपये शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे दिले. ते पैसे स्वत:च्या मांडीखाली दाबले नाहीत. माझी ती तसली प्रवृत्ती नाही आणि परंपराही नाही. आता अडचणी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते करत आहे. निवडणूक डोक्यात घेवून बसलो नाही. या अडचणींचे निर्मिक असणारे स्वत:चे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. असं जर असेल तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदली करा, असे आव्हान मदन भोसले यांनी दिले.

शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारासाठी मर्ढे (ता. सातारा) येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मानसिंगराव शिंगटे, सरपंच शरद शिंगटे, सोसायटीचे चेअरमन सुधाकर शिंगटे, उमेदवार रतनसिंह शिंदे, दिलीप शिंदे, पै. जयवंत पवार उपस्थित होते. मदन भोसले म्हणाले, शेतकर्‍यांच्या हितासाठीच प्रकल्प उभारले. ते करताना काही अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत. त्याचा ताण आला. त्यातून सावरण्यासाठी जिद्द पणाला लावली. त्यासाठी शरप पवार यांचीही अनेकदा भेट घेतली. विरोधकांसारखं स्वत:ला काही मागायला गेलो नव्हतो. कारखान्याचे मालक असलेल्या शेतकर्‍यांसाठी कसलाही इगो न दाखवता जेथे जेथे जावे लागेल तिथे तिथे गेलो. राज्य सहकारी बँक 125 कोटी रुपये देण्यासाठी तयारही होती. प्रत्येक कारखाना दरवर्षी पैसे उभे करुनच चालवला जातो. आज उद्या करता करता अचानक एक दिवस बँकेने पैसे देण्यास नकार दिला. हा नकार आपल्या विरोधकांच्या आडवे जाण्यामुळेच मिळाला हे सत्य आहे. त्यानंतर इतर ठिकाणी प्रयत्न केले तर तिथे प्रत्येक ठिकाणी आडवे जाणारे हेच. आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडून मदत मिळण्याचा मार्ग असताना तिथूनही मदत मिळणार नाही असे हेच सांगत आहेत.

कारखान्यासमोर अडचणी आहेत आणि त्या दूर करण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्या जबाबदारीपासून पळ काढला नाही. धाडसाने त्याला सामोरा जात आहे. शेतकरी, कामगारांना त्यांच्या हक्काचं दिल्याशिवाय राहणार तर नाहीच शिवाय शेतकर्‍यांची मालकी टिकवण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही, असेही मदनदादा म्हणाले. रतनसिंह शिंदे म्हणाले, मदन भोसले आणि आमचे राजकीय पक्ष त्यावेळी वेगळे होते. मी स्व. मदनराव आप्पांचा कार्यकर्ता. पण कारखान्यात मदन भोसले यांनी पारदर्शकपणे काम करताना मी आप्पांचा कार्यकर्ता म्हणून मला एकदाही गैर वागणूक दिली नाही. मदनरावआप्पांप्रती त्यांनी कधी द्वेष बाळगल्याचे मी पाहिले नाही. उलट आप्पा मंत्री झाल्यानंतर आप्पांचा वाईत जावून सत्कार केला. 24 तास डोक्यात राजकारण ठेवून वावरणारे असे आपले विरोधक जगाच्या पाठीवर कुठे नसतील. मानसिंगराव शिंगटे, पै. जयवंत पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी सरपंच अरविंद शिंगटे यांनी, स्वागत सोसायटीचे चेअरमन सुधाकर शिंगटे यांनी तर आभार रामगुरुजी शिंगटे यांनी मानले. यावेळी पै. मधुकर शिंदे, माजी सरपंच अरविंद शिंगटे, उपसरपंच आप्पासाहेब शिंगटे, पै. माणिक पवार, बाळासाहेब शिंगटे, धर्माजी शिंगटे, अर्जुन भोसले, सुरेश पवार, सुभाष शिंगटे, तुकाराम जाधव, शामराव शिंदे, जगन्नाथ शिंगटे, सयाजी निकम, शंकर शिंगटे, बापू शिंगटे, स्वप्निल शिंगटे, शेतकरी सभासद उपस्थित होते.

Back to top button