कराडच्या भाजी मंडईला मिळणार नवी जागा

भाजी मंडई
भाजी मंडई

कराड : प्रतिभा राजे
कराडच्या भाजी मंडईचा प्रश्‍न अनेकदा ऐरणीवर आला आहे. जागा नसल्याने भाजी विक्रेते कोठेही बसत असल्याने अंतर्गत रस्ते पॅक झाले असताना आता मुख्य रस्त्यांवरही भाजी मंडई भरू लागल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. यासाठी नगरपालिकेशेजारी असणारी सध्याची गोरक्षणाची जागा संपादित करून त्याठिकाणी मंडई बसवण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या हालचाली सुरू असून, येत्या सहा महिन्यांत भाजी विक्रेत्यांना जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

कराडसह बाहेरच्या भागातीलही विक्रेते गुरुवार, रविवारच्या बाजार दिवसासह अन्य दिवशीही कराडमध्ये भाजी विक्रीसाठी येत असल्याने विक्रेत्यांच्या लांबलचक रांगा अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्ते पॅक करत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंडईमध्ये सध्या असणार्‍या गोरक्षणाची जागा भाजी मंडईसाठी संपादित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे. याबाबत तडजोडी सुरू आहेत. सहा महिन्यांत याबाबतचे प्रश्‍न मिटणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.छ. शिवाजी भाजी मंडईमध्ये 2011 मध्ये इमारत बांधण्यात आली. त्यामध्ये विक्रेत्यांसाठी गाळे काढण्यात आले. 2013 मध्ये या इमारतीमध्ये गाळे सुरू झाले. मात्र, यातील अनेक गाळे पडून आहेत. तसेच गाळेधारकांना आकारण्यात आलेले डिपॉजिट, भाडे याचा वाद मिटलेला नाही. या इमारतीमध्ये सर्वच भाजी विक्रेते बसत नाहीत. त्यातच तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजी विक्रीसाठी येत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवरची जागा पॅक होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाहेरच्या विक्रेत्यांना जागा देणे गरजेचे आहे.सध्या मंडई परिसरात कोंडी होत असल्याने एखादे मोठे वाहन त्याठिकाणी ये- जा करू शकत नाही. मात्र अत्यावश्यक गरजेच्या वेळी मात्र मोठे वाहन आत न्यायचे असेल तर मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पालिकेचे विक्रेत्यांसाठी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्तेही पॅक

छ. शिवाजी भाजी मंडईच्या इमारतीपासून नगरपालिकेला भाजी विक्रेत्यांचा वेढा असतो. प्रभात टाकीलाही आता विक्रेत्यांचा वेढा पडत असून कोर्टापर्यंत भाजी विक्रेते बसत आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) च्या भिंतीलगत दोन्ही बाजूंनी भाजी विक्रेते बसलेले असतात. तर टाऊन हॉलच्या समोरील फुटपाथवरही भाजी विक्रेते बसत असल्याने मुख्य रस्त्यावर दर गुरुवारी व रविवारी वाहतूक कोंडी होत आहे. जागा मिळेल तिथे विक्रेते बसत असल्याने शहरातील रस्ते पॅक होत आहेत.

भाजी विक्रेते एकाच ठिकाणी बसवण्यासाठी किमान 1 एकर जागेची आवश्यकता आहे. अशी जागा शहरामध्ये कोठेही उपलब्ध नाही. सध्या असणार्‍या गोरक्षण जागेवर भाजी मंडईचे आरक्षण आहे. त्यामुळे हीच जागा मंडईसाठी संपादित करण्यात येणार असून येत्या सहा महिन्यांत संपादन प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व भाजी विक्रेते याच ठिकाणी बसवले जाणार आहेत.
– रमाकांत डाके,
मुख्याधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news