वर्धा; पुढारी वृत्तसेवा : यंदा विदर्भावर सूर्यदेव चांगलाच तळपत आहे. विदर्भातील जिल्हे दररोज तापमान वाढीत नवनवे विक्रम नोंदवित आहेत. यामध्ये सोमवारी (दि.२५) रोजी वर्ध्याने देखिल आघाडी घेत विदर्भात सर्वाधिक हॉट ठरले. वर्ध्यामध्ये सोमवारी विक्रमी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वर्ध्याचे तापमान सर्वाधिक आहे. उन्हाच्या तप्त झळांनी बाहेर पडताना विचार करण्याची वेळ नागरिकांर आली आहे.
यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरपासूनच तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली होती. मार्च महिन्यात पारा ४० अंशांच्या पुढे सरकला. एप्रिल महिन्यात ४२ ते ४३ अंशांच्या घरात तापमान राहिले. १९ एप्रिल रोजी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. चार ते पाच दिवस सलग ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती, पण पारा ४० अशांच्या वर होता. त्यात सोमवारी तापमानाने ४५ अंश सेल्सिअस नोंद केली.
वर्धा नंतर विदर्भात ब्रह्मपुरी ४४.९, चंद्रपूर ४४.६, अकोला ४४, नागपूर ४३.६, यवतमाळ ४३.५, गोंदिया ४३.४, वाशिम ४२.५, अमरावती ४२.६, गडचिरोली ४२, बुलडाणा ४१ अशी तापमानाची नोंद झाली.
सध्या विदर्भात सूर्य आग ओकत असल्याने रस्ते ओस पडत आहेत. त्यामुळे एकप्रकारे अघोषित संचारबंदीच लागू झाली आहे. रस्त्यावरील वर्दळ सकाळी दहा वाजतापासूनच कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उन्हापासून संरक्षणार्थ स्कार्फ, दुपट्टा, रुमाल आदीचा वापर वाढला आहे.