
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या दिलेल्या आव्हानानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राणा दाम्पत्याची खार पोलीस ठाण्यात भेट घेण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यात ते जखमी झाले. याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आज (सोमवार) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खार पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव जामीन मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
२३ एप्रिलरोजी राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सोमय्यांच्या गाडीवर चप्पल, बाटली, दगड भिरकावले होते. यादरम्यान एका शिवसैनिकाने गाडीच्या दिशेने भिरकावलेल्या दगडाने गाडीची काच फुटली होती. यात सोमय्या यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्या हनुवटीला जखमी झाली होती. पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला करत किरीट सोमय्यांची गाडी बाहेर काढली होती.
या हल्ल्यावेळी शिवसैनिकांसोबत विश्वनाथ महाडेश्वर तेथे उपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये महाडेश्वर यांचे नाव आहे. त्यामुळेच खार पोलिसांनी कारवाई करत महाडेश्वर यांना अटक केली होती. त्याचबरोबर हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर आणि दिनेश कुबल या शिवसैनिकांनाही अटक करण्यात आली होती. दरम्यान, हल्लाप्रकरणी सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमय्यांवर हल्ला झाला होता. त्यामुळे हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या हल्ल्यामागे महाडेश्वर असल्याचा आरोप करण्यात आल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
हेही वाचलंत का ?