Umran Malik : ‘जम्मू एक्स्प्रेस’ उमरान मलिकच्या भेदक गोलंदाजीची सोशल मीडियावर चर्चा | पुढारी

Umran Malik : ‘जम्मू एक्स्प्रेस’ उमरान मलिकच्या भेदक गोलंदाजीची सोशल मीडियावर चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उमरान मलिक (Umran Malik) हा सनरायझर्स हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज असून तो आपल्या वेगाच्या जोरावर आता क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. काल (दि. १७) पंजाब किंग्ज विरुद्धच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्याने धुमाकूळ घातला. उमरानने हे षटक निर्धाव टाकत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यातील दोघांच्या त्याने दांड्या गुल केल्या तर एकाचा स्वत: झेल पकडत माघारी धाडले. या षटकात एक खेळाडू धावबादही झाला. त्यामुळे मलिकच्या एका षटकात पंजाबने चार विकेट गमावल्या. त्यामुळे आयपीएलमधील मलिकची भेदक गोलंदाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू झाली आहे.

युवा गोलंदाज उमरान मलिकवर (Umran Malik) सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. हा उमरान मलिक नाही, तर तो एक वादळ आहे. त्याला हॅट्ट्रिकच्या संधीने हुलकावणी दिली असली तरी त्याने शेवटचे षटक निर्धाव फेकून तीन विकेट घेत इतिहास रचला. यासह एक धावबाद ही करण्यात मोठा वाटा उचलला. त्यामुळे आयपीएलच्या कोणत्याही एका सामन्याच्या डावाच्या शेवटच्या षटकात 4 विकेट पडल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. उमरानच्या आधी फक्त इरफान पठाण आणि जयदेव उनाडकट यांनीच 20 वे षटक निर्धाव फेकले आहे.

हरभजन सिंगनंतर उमरानने (Umran Malik) एका सामन्यात दोन कॉट ॲन्ड बोल्ड करण्याचा विक्रम केला आहे. उमरानने फेकलेल्या भेदक चेंडूने फलंदाजांची तारांबळ उडाली. त्याच्यावर बनवलेल्या मीम्स आणि मेसेजने सोशल मीडियावर धुरळा उडाला आहे. क्रिकेट चाहते उमरानच्या भेदक गोलंदाजीची चर्चा करण्यात मग्न झाले आहेत. अनेक नेटक-यांनी ‘उमरान मलिक भाई.. तुम बॉल फेक रहे हो की बॉम्ब’, अशीच प्रतिक्रिया दिली आहे.


 

Back to top button