भाऊसाहेबांच्या नावाने शिष्यवृत्तीसाठी १ कोटी देणार : शरद पवारांची घोषणा | पुढारी

भाऊसाहेबांच्या नावाने शिष्यवृत्तीसाठी १ कोटी देणार : शरद पवारांची घोषणा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. याकरिता लोकवर्गणी करा. कृषी महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब, मागासवर्गीय, आदिवासी व शेतकऱ्यांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जावी. शिष्यवृत्तीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून १ कोटी देण्याची घोषणा शरद पवार यांनी केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांचा ५७ वा पुण्यतिथी कार्यक्रमात आज (दि.१०) ते बोलत होते.

पीडीएमसी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. सोबत सांस्कृतिक भवनाच्या धर्तीवर तयार केलेल्या छत्रपती शिवाजी सभागृहाचे उद्घाटन पवार यांनी केले.

रयतनंतर शिवाजी शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. भाऊसाहेब देशमुख यांनी दिल्लीत सातत्याने ९० दिवसांपर्यंत कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड तसेच अन्य विदेशातून कृषी वैज्ञानिक मोठ्या उत्साहाने भाग घेत होते. देशातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा. म्हणून भाऊसाहेब नेहमीच प्रयत्नशील होते, असे पवार म्हणाले.

भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाने जळगाव ते नागपूरपर्यंत सुतगिरणी सुरू करण्याचा उपक्रम चालविला होता. त्यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी जबरदस्त प्रतिसाद देत या उपक्रमात सहभागी नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था देखील केली होती, असे शरद पवार म्हणाले. संविधान निर्माण समितीत डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी केलेल्या मौलिक सुचनांचा उल्लेख संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, क्रीडामंत्री सुनील केदार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, रामचंद्र शेळके, हेमंत काळमेघ, ॲड. गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, प्रकाश पोहरे, आमदार देवेंद्र भूयार, आमदार अमोल मिटकरी, प्रकाश गजभिये, सुधीर भोगे उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button