पुणे : नवलाख उंबरे येथील पुरातन मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात | पुढारी

पुणे : नवलाख उंबरे येथील पुरातन मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

वडगाव मावळ, पुढारी वृत्तसेवा : नवलाख उंबरे येथील स्वयंभू स्थान असलेल्या पुरातन श्रीराम मंदिरामध्ये आज (दि.१०) विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावच्या हद्दीत सुधा-बुधा नदीच्या संगमावरील पाण्याच्या डोहामध्ये इ.स.१२०० मध्ये शिवजीबुवा गुरव यांना श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई अशी स्वयंभू मूर्ती सापडली होती. दरम्यान, त्याठिकाणी मूर्ती असल्याचा साक्षात्कार शिवजीबुवांना झाला होता. त्यानुसार त्यांनी ही मूर्ती पाण्यातून काढली व पाषाणावर आणून ठेवली. त्यानंतर इ.स.१२३८ मध्ये याठिकाणी मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून, त्याठिकाणी शिवजीबुवांची समाधीही आहे अशी येथील अख्यायिका आहे.

स्वयंभू मूर्ती असलेल्या या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्‍व असून याठिकाणी असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. आज श्रीरामनवमी निमित्त मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा पार पडला.

  • सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास प्रारंभ

    श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दि.४ पासून श्रीमद भागवत कथा व श्रीराम विजय ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा हभप बाळा महाराज उडाफे यांच्या मधुर वाणीने संपन्न झाला. आज पहाटे अभिषेक, सकाळी हभप महारुद्र महाराज रेड्डी यांचे कीर्तन व जन्मोत्सव सोहळा, महाप्रसाद, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले. सोमवारी (दि.११) हभप दुर्गाप्रसाद महाराज किडके यांचे काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, श्रीराम मूर्तींचा उटीचा कार्यक्रम, पालखी मिरवणूक, मंगळवारी (दि.१२) सकाळी पालखी मिरवणूक, पादुका पूजन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

पुजाऱ्यांची बारावी पिढी !

प्रभू श्रीरामाच्या मूर्तींचा शोध लावलेल्या शिवजीबुवांची बारावी पिढी सध्या या पुरातन मंदिरामध्ये पुजारी म्हणून कार्यरत असून तेव्हापासून चालत आलेल्या प्रथा परंपरेप्रमाणे पूजा व सर्व धार्मिक विधी याठिकाणी पार पडतात, अशी माहिती पुजारी अनिल गुरव यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button