बीड : अत्तर, सुरम्याचा भाव वाढला | पुढारी

बीड : अत्तर, सुरम्याचा भाव वाढला

गेवराई (गजानन चौकटे) : मागील दोन वर्षांपासून कोरोनाकाळात बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. मात्र, यंदा महामारीचे संकट टळले अन् बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. रमजान सणानिमित्त बच्चे कंपनीपासून ते वृध्दापर्यंतच्या आवडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तरांचा सुगंध बाजारात दरवळू लागला आहे. खरेदीसाठी गेवराई शहरात मुस्लिम बांधवांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील अत्तरप्रेमींकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. रमजान महिन्याच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजल्या आहेत. तर डोळ्यात सुरमा लावण्याची परंपरा असल्याने परिसरातील ५० ते ६० दुकानांमध्ये विविध प्रकारच्या अत्तराचा सुगंध दरवळला आहे. सुरमा व अत्तराची विक्री वाढली आहे. ३० रुपयांपासून ते ५ हजार रुपये दहा ग्रॅम, असे सुवासिक अत्तराचे दर आहेत.

येथील शास्त्री चौक, मेन रोड, इस्लामपुरा आदी भागात अत्तराची दुकानं थाटलेली पाहावयास मिळत आहेत. उन्हाळ्यात अत्तराचे  गुलाब, मोगरा रूहे खस, डेनिम, सफारी हे प्रकार वापरले जातात. हिवाळ्यात हीना शमामुल, महेफिल- ए दरबार, मुश्कसारख्या अत्तराची जास्त मागणी असते. डोळ्यात घालण्यासाठी सुरम्यालाही चांगली मागणी आहे. रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात सुरम्याची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अत्तराचे प्रकार

जन्नतुल फिरदोस ३२० , पॉयझन ३२०, मिलाप ३२० रूहे गुलाब ३२०, मोगरा ३२०, महेफिल ए दरबार ३४०, शमामुल अंबर ५२०, सफारी २८०, रूहे खस ६००, हीना ५२० रुपये. तसेच सुरमा, सुरमेदानीचीही विक्री वाढली आहे. ३० रुपयांपासून ते ५ हजार रुपये दहा ग्रॅम असे अत्तराचे दर आहेत.

मुंबई, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणाहून अत्तर शहरात विक्रीसाठी येतात. सुरमा ठेवण्यासाठी आकर्षक सुरमेदानी खरेदी करण्यावर ग्राहकांचा कल असतो. त्याचे दर ११० रुपये ते ४०० रुपयापर्यंत आहेत. ४० रुपयात १० ग्रॅम असा त्याचा दर असतो.
– शेख जाजीब, अत्तर विक्रेते, गेवराई

 

ईदसाठी नवीन कपडे खरेदी व अत्तराचा सुगंध लावण्याची (सुन्नत) प्रथा आहे. यंदा मात्र बाजारपेठेत गर्दी असून गेल्या वर्षी नवे कपडे खरेदी होऊ शकले नव्हते. परिणामी जुन्या कपड्यांवरच मुस्लिम बांधवांना ईदची नमाज अदा करावी लागली होती; परंतु, या वर्षी कोरोनाचे संकट टळल्‍याने ईदचा उत्साह मोठा आहे.
-शेख शफिक, नागरिक

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button