चंद्रपुरात अवकाशातून कोसळलेल्या वस्तू सॅटेलाईट रॉकेट बुस्टरचे अवशेष : इस्त्रो

चंद्रपुरात अवकाशातून कोसळलेल्या वस्तू सॅटेलाईट रॉकेट बुस्टरचे अवशेष : इस्त्रो
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंदपूर जिल्ह्यात २ ते ६ एप्रिल या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी सिंदेवाही, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यात अवकाशातून कोसळलेले अवशेष हे सॅटेलाईट रॉकेट बूस्टरचेच अवशेष आहेत, असा खळबळजनक खुलासा इस्त्रोचे वैज्ञानिक एम. शाहजहान आणि मयुरेश शेट्टी यांनी केला आहे. आज (शुक्रवार) बेंगलोर स्थित अवकाश संस्था (इस्त्रो) च्या दोन वैज्ञानिकांनी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होऊन अवकाशीय अवशेषांची पाहणी केली. मात्र, हे अवशेष कोणत्या देशाच्या सॅटेलाईटचे आहेत, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान, निरीक्षणाअंती सरकारला याबाबत माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लाडबोरी गावात प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिल्यानंतर 'सुदैवाने नागरिक बचावल्याची' पहिली प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. दोन तासाच्या पाहणीनंतर त्यांनी नागपूर मार्गे बंगलोरला प्रयाण केले.

शनिवारी ( दि.२) रात्री आठच्या सुमारास आकाशातून ज्वलनशील अवशेष जमिनीच्या दिशेने कोसळताना राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांना अनुभवता आला. भितीदायक आवाजात हे अवकाशीय अवशेष चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी ह्या छोट्याच्या गावात खाली जागेवर कोसळले. तर त्याच सुमारास याच तालुक्यात पवनपार येथे गोलाकर सिलिंडर कोसळला. सुदैवाने लाडबोरी गावात मोठी जीवितहानी टळली. त्यानंतर याच तालुक्यात आसोलामेंढा परिसर मऱ्हेगाव व गुंजेवाही येथे अवशेष आढळून आले. ब्रम्हपुरी येथे एकारा बोदरा गावालगत शेतशिवारात एक सिलिंडर आढळून आला. त्यानंतर चिमूर तालुक्यात खडसंगी परिसरात वनाधिकाऱ्यांना गस्तीदरम्यान सिलेंडर व शेतकऱ्यांना पुन्हा एक रिंग मिळाली. तब्ब्ल सहा गोल सिलिंडर तर २ रिंग अवशेष जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळून आले होते.

या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी इस्त्रोकडे तक्रार करून जिल्ह्यात आढळून आलेल्या अवशेषांचे निरीक्षण करण्याची विनंती इस्त्रोकडे केली होती. तब्बल आठवडाभरानंतर आज शुकवारी (8 एप्रिल 2022) ला पहाणी करण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक एम.शाहजहान आणि मयुरेश शेट्टी चंद्रपूरात दाखल झाले. त्यांनतर त्यांनी अवशेष ठेवलेल्या सिंदेवाही पोलिस ठाण्यात भेट दिली. यावेळी त्यांच्यासमेवेत स्कॉय वाच गृपचे अध्यक्ष तथा खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे उपस्थित होते.

सर्वप्रथम त्यांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात गोळा केलेल्या सहा सिलेंडर आणि दोन रिंगाची पाहणी केली. त्यांचे निरीक्षण करीत त्यांचे चित्रीकरण आणि फोटो घेतले. त्यानंतर प्रा. चोपणे व अधिकाऱ्यांशी अवकाशीय वस्तूबात चर्चा केली. जिल्हयात आढळून आलेले सर्वच ठिकाणचे अवशेष सिंदेवाही पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्यांनतर त्यांनी सर्वात पहिले रिंग कोसळलेल्या लाडबोरी गावातील घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मार्गक्रमण केले. गावाच्या मध्यंतरी खाली जागेतील अवकाशीय अवशेष कोसळल्याचे ठिकाण पाहून 'सुदैवाने नागरिक बचावले नाही. तर मोठी जीवितहानी झाली असती, ' अशी सर्वात पहिली प्रतिक्रीया व्यक्त केली. नागरिकांशी संवाद साधला. घटनास्थळाचे निरीक्षण करून पवनपार गावाला भेट दिली. त्या ठिकाणी घटनास्थळ आणि नागरिकांशी संवाद साधला.

हे अवशेष इस्त्रोच्या कंटेनरमध्ये आजच बंगलोरला नेले जाणार आहेत. हे अवशेष कुण्या देशाचे आहे, कुणाची जबाबदारी आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी नकार दिला. एका आठवड्यात यावर संशोधन करून निर्णय दिला जाईल, असेही एम.शाहजहान आणि मयुरेश शेट्टी यांनी सांगितले. आठवडाभरापासून सर्वत्र चंद्रपूर जिल्हयात आढळून आलेल्या अवकाशीय अवशेषांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आज इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीत ते अवशेष सॅंटेलाईट रॉकेट बूस्टरचेच अवशेष असल्याचा खुलासा झाल्याने तर्कवितर्कांना सध्यातरी पूर्ण विराम मिळाला आहे. इस्त्रोच्या निरीक्षण अहवालानंतरच हे रॉकेट बुस्टरचे अवशेष कोणत्या देशाचे आहेत हे कळणार आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news