अमरावती : पेनड्राईव्हमुळे अल्‍पवयीन मुलीच्या अत्‍याचाराला फुटली वाचा | पुढारी

अमरावती : पेनड्राईव्हमुळे अल्‍पवयीन मुलीच्या अत्‍याचाराला फुटली वाचा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा एनसी प्रकरणात चौकशीकरिता एका तरूणाला ताब्यात घेतले होते. या तरुणाजवळील पेनड्राईव्हने एका  अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्‍याचाराला वाचा फुटली. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आरोपी अतुल भास्करराव शिंद्र (वय 38 रा. आशा कॉलनी, तपोवन) याला अटक केली आहे.

पेनड्राईव्ह मध्ये आढळले दोघांचे व्हिडिओ कॉल 

गाडगेनगर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी 2 एप्रिल रोजी तक्रार नोंदवली की, कोतवाली ठाण्यातील पोलिस निरीक्षक निलीमा आरज यांनी एनसी प्रकरणाच्या चौकशीकरिता आणलेल्या तरुणाजवळ एक पेनड्राईव्ह आढळला. या पेनड्राईव्हची तपासणी केली असता, त्या तरुणाने एका 16 वर्षीय मुलीसोबत शारिरिक संबंध प्रस्थापीत करून दोघांचे वैयक्तीक व्हीडीओ कॉल रेकॉर्ड केल्याचे दिसून आले.

सामाजिक जबाबदारी म्हणून पोलिसांची फिर्याद 

पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. याबाबतची माहिती पोलिसांनी पीडितेच्या पालकांना दिली. मात्र त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतू सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आणि बाल लैंगिक शोषणाचा असल्यामुळे पोलिसांनी सामाजिक जबाबदारीची जाण ठेऊन आणि पुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता सरकारतर्फे लेखी फिर्याद दिली. या घटनेची तक्रार पोलिस निरीक्षक रेखा लोंढे यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली असून, त्यानुसार पोलिसांनी आरोपी अतुल शिंद्र याच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Back to top button