युवासेनेचे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘थाळी बजाओ’ आंदोलन | पुढारी

युवासेनेचे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ 'थाळी बजाओ' आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंधन दरवाढीची झळ मागील १० दिवसांपासून कायम आहे. वाढत्या इंधन महागाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. उन्हाबरोबर नागरिकांना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज (रविवार) युवासेनेच्या वतीने राज्यभरात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. मुंबई, वाशिम, धुळे, बीड, यवतमाळ, जळगाव येथे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी थाळी नाद करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

बीडमध्‍ये मोदी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी

युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीडमधील साठे चौकात थाळी नाद करत मोदी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. धुळ्यातील भगवा चौक येथील शिवसेना कार्यालयापासून स्वस्तिक चित्रपटगृहपर्यंत थाळी नाद करण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत नागरिकांना गाजर वाटप करण्यात आले. भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी नागरिकांना दाखवलेले आश्वासनाचे गाजर आणि त्यानंतर उडालेला महागाईचा भडका याचा निषेध करण्यात आला. धुळ्यातील युवासेनेचे पदाधिकारी पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जुना आग्रा रोड परिसरात नागरिकांना गाजराचे वाटप करून केंद्र सरकारच्या महागाईविरोधात निषेध व्यक्त केला.

टिटवाळा स्टेशन परिसरात महिला कार्यकर्त्यांचे आंदाेलन

टिटवाळा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आणि महागाई विरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाचे फलक झळकावत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. टिटवाळा स्टेशन परिसरात महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यानी भाकरी थापून महागाईच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.

औरंगाबाद शहरात ठीकठिकाणी आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात युवासेनेच्या वतीने औरंगाबाद शहरात ठीकठिकाणी आंदोलन करण्यात आले. ज्या पद्धतीने कोरोना पळवून लावण्यासाठी थाळी वाजवण्याचा कयास लावला होता. त्याप्रमाणे थाळी वाजवल्यानंतर मोदी साहेबांना महागाई पळवून लावण्याची सद्बुद्धी लाभावी, यासाठी आणि केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाईचे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

वाशिममधील सहा तालुक्‍यांत आंदाेलन

वाशिममध्‍ये खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पाटणी चौकात थाळी व ताली बजाव आंदोलन करण्यात आले. युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे यांनी सिलिंडरला हार घालून फटाके फोडले. यावेळी शिवसैनिक व युवासैनिकांनी केंद्रातील सरकारविरोधात ‘देश का युवा बेरोजगार, मोदी सरकार मोदी सरकार’, महंगाई की हाहाकार, मोदी सरकार मोदी सरकार’ अशा घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. जिल्हयातील रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा व वाशिम अशा सहाही तालुक्यात युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख मंगलाताई सरनाईक आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

 

 

 

Back to top button