यवतमाळ : विहिरीतील गाळात फसून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू | पुढारी

यवतमाळ : विहिरीतील गाळात फसून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्‍हातील किनवट गावामधील पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होती. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीमध्ये चौघे उतरले. यापैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला. तर वरती थांबलेल्या एका मित्रामुळे दोनजण सुखरूप बचावले. ही दुदैवी घटना रविवारी (दि.27) दुपारी मोहदा शिवारातील शेतात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या घटनेत अक्षय मनोज पवार (वय १०) व रणजित श्रीराम भोसले ( वय ११, रा. किनवट, ता. कळंब) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कळंब तालुक्याच्या किनवट गावावर शोककळा पसरली आहे. अक्षय पवार, रणजित भोसले, शिवम पवार (वय १०), रोहन घोसले (वय ९), विरण पवार (वय ७) असे पाचजण मित्र गावशिवारात गुरे चारत होते.

दुपारच्या वेळी तहान लागल्याने ते कुंच्या मांडवकर भोसले यांच्या शेतातील विहीरीवर गेले. १२ ते १५ फूट खोल असलेल्या या विहिरीला भरपूर पाणी असून, त्यात सहज उतरता येते, त्यामुळे चौघे खाली उतरले. तर एकजण वरतीच थांबला. यातील अक्षय व रणजित अचानक पाण्यात पडून गाळात फसले. हा प्रकार पाहून वर थांबलेल्या विरण पवार याने आरडाओरड केली. त्यावेळी जवळच असलेला गंगाधर काळे हे धावून आले. त्यांनी शिवम पवार व रोहन घोसले या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्‍यान, घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव घटनास्थळी पोहोचले. कळंब पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मोहदा येथील पोलीस पाटील पीयूष गब्रानी यांनी पांढरकवडा पोलिसांना कळविले. त्‍यानंतर पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी संपूर्ण कारवाई पार पाडून अक्षय पवार व रणजित भोसले यांचे मृतदेह ताब्‍यात घेतले. सोमवारी दोघांवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा  

Back to top button