परभणी : जिल्‍हा पाेलिस अधीक्षकांच्‍या कर्तव्यदक्षतेमुळे वाळू माफियांनी केलेल्‍या खूनाचा उलगडा | पुढारी

परभणी : जिल्‍हा पाेलिस अधीक्षकांच्‍या कर्तव्यदक्षतेमुळे वाळू माफियांनी केलेल्‍या खूनाचा उलगडा

गंगाखेड ; पुढारी वृत्‍तसेवा गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रावराजुर (तालुका पालम) येथील अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या माधव त्र्यंबक शिंदे या इसमास लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण केली होती. यानंतर त्‍यांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली होती. सदरील प्रकरण लाखो रुपये देऊन मिटवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे लाखो रुपयांचे आमिष देऊन दाबण्यात आलेल्या या खूनाचा अखेर उलगडा झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रावराजुर (तालुका पालम) वाळू धक्का जिल्हा महसूल प्रशासनाने लिलावात काढला आहे. परंतु या ठिकाणी सरकारी नियम मोडून व रात्रीच्या वेळी होणारे वाळू उत्खनन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या माधव त्र्यंबक शिंदे यांना दि.२४ मार्च रोजी रात्री १०:३० वाजता धक्का चालक व त्यांच्या भागीदारांकडून लोखंडी रॉड, काठ्या लाठ्या व दगडाने  बेदम मारहाण झाली होती. यामध्ये उपचारादरम्यान २५ मार्च रोजी माधव यांचा मृत्यू झाला.

शनिवारी दि.२६ मार्च रोजी मृतावर शवविच्छेदना नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मृताच्या कुटुंबियांस आर्थिक प्रलोभने देऊन संबंधित हा खून दाबण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू असतानाच याची कुणकुण जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना लागली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेळीच हस्तक्षेप करत मोठ्या पोलीस फौजफाट्यासह (सोमवार) सायंकाळी गंगाखेड पोलीस स्टेशन गाठले. संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत व घटनास्थळाला भेट दिली. घटनेमधील बारकावे शोधून काढल्यानंतर फिर्यादी श्रावण सोमेश्वर शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात (सोमवार) रात्री २:०० वाजता खूनाचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी श्रावण सोमेश्वर शिंदे यांच्या तक्रारीवरून माधव त्र्यंबक शिंदे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश प्रभू डोंगरे (रा.धनेवाडी ता पालम), सुरेश उत्तमराव शिंदे, ओमप्रकाश ज्ञानोबा शिंदे, संदीप लक्ष्मणराव शिंदे, भागवत प्रकाशराव शिंदे (सर्व रा. रावराजुर ता.पालम), नितीन खंदारे (रा. गंगाखेड), राजेभाऊ बोबडे (रा.गोपा ता गंगाखेड) सर्जेराव विश्वनाथ शिंदे (रा. रावराजुर ता पालम) यांच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास गंगाखेडचे पोलिस निरीक्षक सुनील माने  करीत आहेत.

वाळूमाफियांची गुंडगिरी कधी थांबणार… 

गोदाकाठी अवैध वाळू उपसा करून ‘मालामाल’ झालेल्या वाळू माफियांना मानवी जीव एवढा स्वस्त झाला आहे की काय ? अशी चर्चा रावराजुरच्या घटनेनंतर होत आहे. अवैध वाळूउपसाचा पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदारांना गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र रावराजुरातील खुनाची ही घटना वाळू माफियांना बळ देणारी ठरली होती; परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी या प्रकरणात गंभीर लक्ष घालून खुनाचा उलगडा केला. या निमित्ताने गोदाकाठातील सर्वत्र होत असलेली वाळू मफियांची दादागिरी थांबेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button