छत्रपती शिवराय, जिजाऊ, संभाजीराजे यांचे देशातील पहिले मंदिर बुलडाण्यात बांधणार : संजय गायकवाड | पुढारी

छत्रपती शिवराय, जिजाऊ, संभाजीराजे यांचे देशातील पहिले मंदिर बुलडाण्यात बांधणार : संजय गायकवाड

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : स्वराज्याची निर्मिती, विस्तार व रक्षणासाठी जिजाऊ मॉसाहेब, छत्रपती शिवराय व संभाजीराजे या वंदनीय तीन पिढ्यांचे योगदान प्रेरणादायी व अविस्मरणीय आहे. या त्रयींचे एकत्रित असे देशातील पहिले मंदिर बुलडाणा शहरात उभारले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय गायकवाड म्हणाले की, मंदिर निर्माणासाठी आपण ५० लाखांचा निधी मंजूर करून घेणार असून शहरातील नागरिकांशी चर्चा करून मंदिराचे स्थळ निश्चित केले जाणार आहे. देशात काही ठिकाणी छत्रपती शिवरायांची मंदिरे आहेत. परंतु शिवराय, जिजाऊ आणि संभाजीराजे यांचे एकत्रित मंदिर कुठेही नाही. जिजाऊ मॉसाहेबांच्या प्रेरणेने स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमाने ते विस्तारले आणि स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजे यांनी बलिदान दिले. हा प्रेरणादायी इतिहास आहे. म्हणूनच जिजाऊ, शिवराय आणि संभाजीराजे हे पुढच्या पिढ्यांची दैवते ठरली आहेत.

सिंदखेडराजा हे जिजाऊंचे माहेर आणि शिवरायांचे आजोळ असल्याचा बुलडाणा जिल्हावासियांना चिरंतन अभिमान आहे. यामुळेच बुलडाणा शहरात उभारले जाणारे जिजाऊ, शिवराय व संभाजीराजे यांचे भव्य मंदिर हे जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील युवकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button