बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना गोरेगाव (सिंदखेडराजा) येथे आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गोरेगाव येथील मीरा दत्तात्रय कव्हळे (वय ३६) या विवाहितेचे गावातील एजाजखान पठाण (वय ४५) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या प्रकाराची कुणकुण पती दत्तात्रय कव्हळे (वय ४०)याला लागली होती. तसेच गावातही बोभाटा झाला होता. यामुळे एजाजखानने माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, मीरा व दत्तात्रय हे पती पत्नी कामासाठी अहमदनगरला जाऊन राहिले होते. तर अलिकडेच जमीन खरेदीच्या कामासाठी ते गावाकडे परतले होते. त्यानंतर मीरा व एजाजखानचे अनैतिक संबंध पुन्हा एकदा बहरले. दोघांना दत्तात्रयचा अडसर वाटू लागला. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट त्या दोघांनी रचला.
मंगळवारी (दि. १५) दुपारी दत्तात्रय घरातील पलंगावर आराम करीत असताना पत्नी मीरा व तिचा प्रियकर एजाजखान या दोघांनी मिळून दोरीने गळा आवळून त्याला जीवे मारले. आपला मुलगा दुपार उलटूनही झोपेतून उठला नाही? हे बघायला गेलेल्या त्याचे आईला दत्तात्रय हा पलंगावर निपचित पडलेला पाहून धक्का बसला. आईने दत्तात्रयला दवाखान्यात हलवले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयताची आई तुळसाबाईने आज साखरखेर्डा पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev