पैठणच्या नाथषष्ठी यात्रेसाठी कुठल्याही परिस्थितीत वारकरी येणार : ज्ञानेश्वर जळगावकर | पुढारी

पैठणच्या नाथषष्ठी यात्रेसाठी कुठल्याही परिस्थितीत वारकरी येणार : ज्ञानेश्वर जळगावकर

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण नगरपरिषद प्रशासनाने सोहळा रद्द केला, तरीही नाथषष्ठी वारीसाठी पायी दिंडी घेऊन राज्यातील विविध देवस्थानासह निघालेले वारकरी पैठणनगरीमध्ये कुठल्याही परिस्थिती येणार आहेत. तरी प्रशासनाने दोन वर्षानंतर होणारा सोहळा रद्द करू नाही, अशी मागणी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी  म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे खंडित झालेला नाथषष्ठी यात्रा महोत्सव दि. २० ते २३ मार्च दरम्यान होत आहे. सध्या पैठणमध्ये कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्ण बाधित नसून नाथषष्ठी मध्ये सहभाग होण्यासाठी येणारे वारकऱ्यांनी दोन डोस घेतलेले आहे. अशांना या सोहळ्यामध्ये सहभाग होण्यास काही हरकत नाही. यात्रा नियोजनासाठी यात्रा अनुदान समितीने नगर परिषद प्रशासनाला नियोजनासाठी निधी उपलब्ध करून मंजुरी दिलेली आहे.

दरम्यान,  जिल्‍हाधिकारी सुनील चव्‍हाण यांच्या आदेशानुसार नगरपरिषदसह विविध विभागाच्या वतीने यात्रा नियोजन संदर्भात काम हाती घेण्यात आले होते. आज बुधवार रोजी जिल्हा प्रशासनातर्फे यात्रा नियोजन संदर्भात नाथ मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु नायब तहसीलदार विष्णू घुगे यांनी यात्रा संदर्भातील पुढील आदेश येईपर्यंत सदरील बैठक रद्द करून नगरपरिषदसह विविध विभागामार्फत सुरू असलेले यात्रा नियोजनाचे काम थांबवण्याचा आदेश दिला आहे.

त्यानुसार मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी गोदावरी वाळवंटात सुरू असलेले नियोजनाचे काम बंद केले. गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील यात्रेवर संकट आल्यावर यात्रेनिमित्त तयारी केलेले व्यापारी भाविकांत नाराजी पसरली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले, की नगर परिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी आदेश दिल्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत यात्रा नियोजनाचे काम बंद करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ?  

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

Back to top button