पुणे : बोपदेव घाटातून पिस्तुल बाळगणार्याला बेड्या; तीन काडतुसेही जप्त
पुणे : पुढारी वृत्तसेवा
कमरेला पिस्तुल लावून बोपदेव घाटात संशयास्पदरित्या थांबलेल्या एकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रसाद उर्फ सोन्या मारूती साबळे (20, रा. चिखली, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुन्हे रोखण्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलिस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना बोपदेव घाटात एकजण कमरेला पिस्तूल लावून थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व तुषार आल्हाट यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर एक लाल रंगाचा चेक्स डिझाईनचा शर्ट घातलेला, केस वाढविलेला व कमरेला पिस्तुल लावलेला तरूण त्यांना दिसला. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला पाठलाग करून पकडण्यात आले.
त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक गोकुळ राऊत, जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, असगरअली सय्यद, योगेश कुंभार, अमोल हिरवे, दिपक जडे, अभिजीत रत्नपारखी यांनी ही कारवाई केली. प्रसाद साबळेवर वाकड पोलिस ठाण्यात यापूर्वी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. जवळ असलेल्या पिस्तुलातून त्याचा काही घातपात करण्याचा कट होता का ? त्या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

