अमरावती : चांदूर बाजार, वरुड येथील दोन वेगवेगळ्या अपघातात पाच ठार | पुढारी

अमरावती : चांदूर बाजार, वरुड येथील दोन वेगवेगळ्या अपघातात पाच ठार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातांमध्ये (accident) पाच जण ठार झाले. चांदूर बाजार-परतवाडा मार्गावरील कुरळपूर्णा गावाजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार झाले. तर वरुडच्या आमला फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चांदुर बाजार व वरुड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

चांदूरबाजारच्या रुग्णालयात उसळली गर्दी

ट्रक क्रमांक एमपी २० एचबी ३६१२ हा परतवाडा येथून चांदूर बाजारकडे भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी ट्रकने एमएच २७ सिटी ३०५३ या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक (accident) दिली. ही घटना रविवार (दि. ६) रोजी सायंकाळी ७.१५ वाजणाच्या सुमारास घडली. या अपघातात शेख सगीर शेख हबीब (४०), अलकेश पप्पू सालाने ( वय, २२) आणि शेख तनवीर शेख सत्तार (वय ३२, तिन्ही रा. कुरळपूर्णा) यांचा मृत्यू झाला.

या घटनेच्या माहितीवरून मृतांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी चांदूर बाजारच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय परिसरातील गर्दी पाहून चांदूर बाजार ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर यांच्यासह पोलीस पथकाने रुग्णालयात धाव घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले. सोमवारी सकाळी दोन्ही मृतदेहांवर चांदूर बाजारात तर अलकेशच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

नागरिकांनी दिला ट्रकचा क्रमांक पोलिसांना

कुरुळपूर्णा येथील रहिवासी शेख आसिफ उर्फ सोनू हा आपल्या गावी जात असताना, त्याला रस्त्यात अपघात (accident) झाल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ ट्रकचा पाठलाग केला. परंतु चालक हा ट्रक घेऊन चांदुरबाजारातून मोर्शीकडे गेला. दरम्यान, आसिफ शेखने ट्रकचा क्रमांक लिहून घेतला. त्यानंतर त्याने अपघाताची माहिती पोलिसांना देऊन ट्रक क्रमांक सुध्दा दिला.

मोर्शीत पकडला ट्रक

चांदुरबाजार पोलिसांना ट्रक क्रमांक मिळताच, त्यांनी तत्काळ वायलेसद्वारा मोर्शी, बेनोडा व वरुड पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून मोर्शी पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रकला थांबवून चालक सुरेश भुषण पटेल (रा. जबलपूर) याला ताब्यात घेतले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

या घटनेच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एडीपीओ हसन गौहर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी चौकशी करून पोलिसांना योग्य ते निर्देश दिले. पुढील तपास ठाणेदार किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर, पीएसआय प्रतिभा मेश्राम करीत आहेत.

वरुडच्या आमला फाट्यावर दोघांचा मृत्यू

वरुड, आमला फाट्यावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गजानन नत्थूजी हरले ( वय ६०, रा. नागसेन बुद्धविहारजवळ, वरुड) व संतू प्रसाद रॉय (वय ४३, रा. बरसतजी, परगणा (पश्चिम बंगाल) अशी मृतांची नावे आहेत. लेखापाल गजानन हरले आणि अभियंता संतू रॉय हे दोघेही बैतूलच्या घई कन्स्ट्रक्शन कंपनीत कार्यरत होते. कंपनीचे काम आमला येथे सुरु असल्याने ते मजुरांची मजुरी देण्याकरिता दुचाकीवरून (क्रमांक सीजी १३ जेएच ९६९३) जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणात पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button