चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा तर गडचिरोली मधील कमलापूर व पातानील येथील १३ हत्ती गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याच्या निर्णयाला हिरवा कंदिल मिळाला आहे. या तेरा हत्ती पैकी चार हत्तीची देखभाल राधे-कृष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट करणार आहे. हे सर्व हत्ती तातडीने हलविण्याबाबतचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) युवराज एस. यांनी दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील चार सुदृढ हत्तीसोबत पातानील व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथील वयोवृध्द, अप्रशिक्षित व लहान पिल्ले अशा एकूण १३ हत्तींचे पुढील उच्च दर्जाच्या वैद्यकीय देखरेखीसाठी, प्रशिक्षित व अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उपचाराची सोय असणाऱ्या तसेच त्यांना निवासासाठी प्रशस्त व भरपूर जागा असलेल्या जामनगर स्थित राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे पाठविण्यात येणार आहे.
जे हत्ती हलविण्यात येणार आहेत त्यांना यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही. धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर करण्यात येणार नाही. तसेच प्राणिसंग्रहालया प्रमाणे कोठेही प्रदर्शितही करण्यात येणार नसल्याचे मुख्य वसंरक्षकांनी सांगितले.
वन विभागाने हे हत्ती गुजरातमधील जामनगर स्थित राधे-कृष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्टला पाठविण्यासाठी केंद्र शासनाकडून मान्यता प्राप्त करून घेतली आहे. या सर्व हत्तींची आजन्म पालन पोषणाची जबाबदारी सदर ट्रस्टने घेतली असल्याची माहिती वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन-वन्यजीव) तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) युवराज एस. यांनी दिली आहे.
राज्यातील बंदिस्त हत्तींचे उत्तम स्वास्थ्य व व्यवस्थापनासाठी वन विभाग नेहमीच कटिबध्द आहे. या करीता विविध तज्ज्ञ व या क्षेत्रातील मान्यताप्राप्त अशासकीय संस्थांचा सहयोग घेण्यात येत आहे. कमलापूर येथील आठ हत्तींपैकी चार सुदृढ हत्तींसाठी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळासाठी नवीन सोयी सुविधा राधे-कृष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट यांच्याकडून निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ट्रस्टने कमलापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचे व्यवस्थापन करण्याचे मान्य केले आहे. तसेच सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी लागणारा संपूर्ण खर्च ट्रस्टकडून करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी लागणारा खर्चही करण्याचे मान्य केले आहे. यामुळे स्थानिक गावकऱ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
युवराज एस. – नियोजन व व्यवस्थापन-वन्यजीव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)