बदनामीच्या भीतीने गर्भवती मुलीच्‍या खुनाची जन्‍मदात्‍या आईनेच दिली सुपारी | पुढारी

बदनामीच्या भीतीने गर्भवती मुलीच्‍या खुनाची जन्‍मदात्‍या आईनेच दिली सुपारी

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : पतीपासून वेगळी राहत असलेली मुलगी गर्भवती राहिली. यामुळे बदनामी होईल या भीतीने जन्‍मदात्‍या आईनेच मुलीच्‍या खुनाची सुपारी दिली. ही धक्‍कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrpur Murder) विरूर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील उघडकीस आली आहे. सैदा बदावत असे खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे.  याप्रकरणी आई लचमीसह सिन्नू अजमेरा व शादरा अजमेरा या दाम्‍पत्‍याला अटक करण्‍यात आली आहे. विशेष म्‍हणजे, या तिघांनी सैदा बदावत हिने आत्‍महत्‍या केल्‍याचा बनाव केला हाेता; पण विरूर पाेलिसांनी अवघ्‍या ४८ तासांमध्‍ये सखाेल तपास करत या गुन्‍ह्याचा छडा लावला.

दाम्‍पत्‍याला दिली ३० हजार रुपयांची सुपारी

पाेलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार,  मृत सैदा बदावत ही मुळची तेलंगणा राज्‍यातील कोंडापल्ली विजयवाडा येथील रहिवासी हाेती.  तिचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला ९ वर्षांची मुलगी आहे. मागील काही वर्ष ती पतीपासून विभक्त राहत होती. आई-वडीलांबराेबरही तिचा नेहमी वाद हाेत असे. तिनेच आपल्‍या वडिलांना झाेपेच्‍या गाेळ्या देवून खून केल्‍याचा संशय,लचमी हिला हाेता. सैदा ही  गर्भवती राहिली. यामुळे समाजात आपली बदनामी होईल या भीतीने सैदाला खून करण्‍याचा कट तिच्‍या आईने रचला. तिने यासाठी नातेवाईक असलेल्‍या सिन्नू अजमेरा व शादरा अजमेरा  या दाम्‍पत्‍याला  ३० हजार रुपयांची सुपारीही दिली.

गर्भपात करण्‍याच्‍या बहाण्‍याने महिलेला घेवून गेले

सैदा आणि लचमी या दाेघी खंमम ( तेलंगणा ) येथे १४ फेब्रुवारी राेजी  एका लग्नासाठी आल्या होत्या. या लग्‍नाला सिन्नू व त्याची पत्नी शारदाही आले हाेते. येथेच सैदाला संपविण्याचा कट रचण्यात आला. यासाठी दाम्‍पत्‍या लचमीने ५ हजार रूपये दिले. आपल्या गावात गर्भपात करण्यासाठी औषधी मिळत असल्याचे भासवून सिन्नू  हा सैदाला घेवून विरूर परिसरातील मुंडीगेट येथे आला. येथील विहिरीत तिला ढकलेले, मागून दगड फेकला.

 १८ फेब्रुवारी राेजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कविपेठ परिसरातील अर्जुन आत्राम यांच्या शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटविण्यासाठी विरुर पोलिसांनी माध्यमातून आवाहन केले. त्यानंतर तेलगंणा येथून पोलिसांना एक फोन आला. ही महिला तेलंगणातील  कोंडापल्ली विजयवाडा येथील रहिवासी असून तिचे सैदा  बदावत नाव असल्याचे संबंधितांनी पाेलिसांना सांगितले. त्यानंतर पाेलिसांनी सैदाच्‍या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक मिळवला. सैदाच्‍या आईला फोटो पाठवून तिची ओळख पटविण्‍यात आली. आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. तिच्या समक्ष सैदाच्‍या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात सैदा गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

४८ तासांत सैदाचे मारेकरी गजाआड

तेलंगणा राज्यातील महिलेने चंद्रपूर जिल्‍ह्यात आत्महत्या का केली असावी, असा संशय  विरूर पोलिसांना येत होता.  विरुर परिसरातील मुंडीगेट येथील सिन्नू अजमेरा हा तिचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तत्काळ त्याच्याशी संपर्क केला. आपण  हैद्राबादला असल्याचे त्याने सांगितले. तसेच विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारण उत्तरे न देता उडवाडवीचे उत्तरे देवू लागल्याने पोलिसांचा त्‍याच्‍याविषयी संशय अधिक बळावला. लगेच त्याच्या फोन कालडिटेल्स घेतले. घटनेच्या दिवशी सिन्नू मुंडीगेट गावात येऊन गेल्याची माहिती तपासात समोर आली.  विरूर पोलिस ठाण्याचे एक पथक हैदराबाद येथे रवाना होवून त्यांनी सिन्नूचा शोध घेतला. त्‍याने गुन्‍ह्याची कबुली दिली.

विरूर पोलिसांनी मोठ्या कार्यकुशलतेने दोन दिवसात खुनाचा उलगडा केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस हवालदार माणिक वागदरकर, दिवाकर पवार, नारगेवार,विजय मुंडे,सविता गोनेलवार,सुरेंद्र काळे, भगवान मुंडे, अशोक मडावी,प्रमोद मिळविले, अतुल सहारे, लक्ष्मीकांत खंडाळे, ममता गेडाम यांनी तपासात सहकार्य केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button