अहमदनगर : अकोले नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांची निवड | पुढारी

अहमदनगर : अकोले नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांची निवड

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अकोले नगरपंचायत निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती. आज नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले. आज झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सोनाली नाईकवाडी तर उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांची वर्णी लागली आहे. अकोले ग्रामपंचायतीची सन २०१५ साली अकोले नगरपंचायत अस्तित्वात आली. यावेळी पहिल्यांदा झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड यांचे वर्चस्व होते.

अकोले नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायत सभागृहात पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजपचे १२ आणि विरोधी राष्ट्रवादी, शिवसेना आघाडीचे ४ असे १६ नगरसेवक सभेला उपस्थित होते. भाजपच्या सौ. सोनाली नाईकवाडी याना १२ मते पडली. तर नवनाथ शेटे याना ४ मते मिळाली. तर काँग्रेसचे एकमेव नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी सभागृहाकडे फिरकलेच नाहीत.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शंशिकांत मंगरुळे यांनी नगराध्यक्ष पदी सोनाली नाईकवाडी विजयी झाल्याचे घोषित केले. तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्या मुळे ते बिनविरोध निवडून आले. माजी मंत्री मधुकरराव पिचड, भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री , माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराम डेरे यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भात नगरसेवकांची वैयक्तिक मते जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी उपनगराध्यक्ष पदी बाळासाहेब वडजे यांच्या नावाची घोषणा केली. फटाक्यांची आतिषबाजी करीत या निवडीचे स्वागत करण्यात आले. नूतन पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका यांची विजयी रथातून शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत शहरातील नागरिकांनी भाजपाच्या बारा उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. नगरपंचायत नगराध्यक्षपदी सोनालीताई नाईकवाडी व उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे विजय झाले असून जनतेच्या अपेक्षा प्रमाणे विकास कामे पूर्ण होतील असा विश्वास देतो.
-माजी आ. वैभवराव पिचड

हेही वाचलतं का?

 

Back to top button