Ramesh Deo : रमेश देव यांचे आडनाव राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे बदलले, काय आहे नेमका किस्सा

Ramesh Deo : रमेश देव यांचे आडनाव राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे बदलले, काय आहे नेमका किस्सा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Ramesh Deo)

त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून मुलगा अजिंक्य देव अभिनेता तर दुसरा मुलगा अभिनव हा दिग्दर्शक आहे. आनंद सारख्या प्रसिद्ध चित्रपटासह शेकडो चित्रपट रमेश देव यांनी केले आहेत.

रमेश देव हे मूळ राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. त्यांचे वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब कोल्हापुरात आले. रमेश देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे आडनाव 'देव' झाले.

एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले.

सीमा या पूर्वाश्रमीच्या कर्नाटकातील नलिनी सराफ, तर रमेश देव मूळचे राजस्थानी; पण ही जोडी कोल्हापूरच्या मराठी मातीत अस्सल मराठीच म्हणून राहिली.

Ramesh Deo : रांगडा कलाकार हरपला : भालचंद्र कुलकर्णी

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेला कोल्हापूरचा रांगडा कलाकार हरपला, असे भालचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्‍त करताना म्हटले आहे. कोल्हापुरातील फारच कमी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवले आहे. कलेची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना स्वत:च्या हिंमतीवर रमेश देव यांनी चित्रपट सृष्टीत आपले नाव कमावले.

अभिनय, माणुसकीतील देव : चंद्रकांत पाटील

ज्येष्ठ अभिनेते, कोल्हापूरचा अभिमान रमेश देव अभिनय आणि माणुसकीमधील ते खरे देवच होते. अत्यंत बोलका चेहरा, संवेदनशील मन आणि समाजाप्रती संवेदनशीलता ही त्यांची ओळख होती. देखण्या रमेश देव यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होतीच; पण कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रातही त्यांची आठवण कायम असणार आहे. एका मोठ्या मनाच्या व्यक्‍तिमत्त्वाला आज आपण मुकलो आहोत, अशा भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केल्या.

देव यांचे गाजलेले चित्रपट

राम राम पाव्हणं, शारदा, पाटलाचं पोर, महाराणी येसुबाई, ये रे माझ्या मागल्या, कुलदैवत, पसंत आहे मुलगी, पायदळी पडलेली फुले, गाठ पडली ठकाठका, देवघर, आंधळा मागतो एक डोळा, देवाघरचे लेणं, आई मला क्षमा कर, सात जन्माचे सोबती, मानिनी, सप्‍तपदी, एक धागा सुखाचा, अवघाचि संसार, जगाच्या पाठीवर, पैशाचा पाऊस, बाप-बेटे, वरदक्षिणा, सोन्याची पावले, प्रेम आंधळे असते, उमज पडेल तर, आरती, बाप माझा ब्रह्मचारी, भाग्यलक्ष्मी, चार दिवस सासूचे… चार दिवस सुनेचे, अन्‍नपूर्णा, मोलकरीण, शेवटचा मालुसरा, अपराध, आनंद, आहट, काळी बायको, मुजरीम, खिलौना, परदेश, पत्नी, चिंगारी, तिथे नांदते लक्ष्मी, कोशिश, जोरू का गुलाम, रामपूरका लक्ष्मण, ललकार, संजोग, बनफूल, मुनीमजी, कोरा कागज, या सुखानो या, प्रायश्‍चित्त, पारध, पतिता , कशासाठी … प्रेमासाठी अशा विविध चित्रपटांसह त्यांनी गेल्या काही चिमणी पाखरं, चल गंमत करू, तिन्ही सांजा, लग्‍नानंतरची गोष्ट, राजकारण, पिपाणी, जॉली एलएल.बी., वेल डन भाल्या, तात्याराव लहाने यासारख्या चित्रपटात गेल्या दोन दशकांत विविध चित्रपटात भूमिका साकारल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news