भाईंदर (ठाणे), पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात समुद्रात उधनाच्या भरतींची मालिका सुरू होत असते. अशाच भरत्याचे किनाऱ्यावर उधान येऊन मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येतो. किनाऱ्याला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप येत आहे. हा किनारा कचरामुक्त करण्यासाठी पालिकेसह स्थानिक मच्छीमार पुढे आले आहेत. समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर वाहून येणारा कचरा उचलण्यासाठी पालिकेने पुरेशा यंत्रांसह मनुष्यबळ कायमस्वरूपी नियुक्त करावे, अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे.
पालिका आयुक्तांनी शहर स्वच्छतेचा वसा हाती घेतला असताना दुसरीकडे अस्वच्छतेची दखल पालिकेकडून वेळेवर घेतली जात नाही, असा आरोप केला जात आहे. सध्या पावसाळा सुरू असून समुद्राला भरत्या व उधानाचे सत्र देखील सुरू झाले आहे. पावसाळ्यात पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रात वादळे, उधाण येत असल्याने १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारीला बंदी घातली जाते.
मासेमारी बंदिच्या कालावधीत मच्छीमार जाळी विणणे, बोटींची दुरुस्ती करणे आदी मासेमारीशी निगडीत कामे आटपून घेत असतात. ही कामे बहुतांशी किनाऱ्यावरच केली जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून समुद्राला आलेल्या उधानाच्या भरतीतून समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर वाहून आला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांची गैरसोय होत असली तरी किनाऱ्यावरील कचऱ्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा तसेच जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत आहे.
अनेकदा पावसाळ्यात किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत असते. त्यामुळे समुद्र किनारा स्वच्छ ठेवणे, हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य असले आहे. किनाऱ्यावर जमा झालेला कचरा त्वरीत उचलून नेण्यासाठी पालिकेला अनेकदा माहिती वजा तक्रारी केल्या जातात. पण पालिकेकडे मनुष्यबळाखेरीज जेसीबी, डंपर सारखे यंत्रे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने किनाऱ्यावरील साफसफाईला विलंब होतो. यामुळे अनेकदा पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांसोबत स्थानिक मच्छीमार देखील किनारा स्वच्छतेची कामे करतात. यावेळी समुद्रातील उधनाच्या भरत्यांमुळे किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात कचरा वाहून येतो. हा कचरा तात्काळ उचलण्यात यावा, यासाठी पालिकेसह आपत्कालीन कक्षाला संपर्क साधण्यात आल्यानंतर किनाऱ्यावर मनुष्यबळासह जेसीबी, डंपर दाखल झाले.
जेसीबीने किनाऱ्यावरील कचरा स्वच्छ केला जात असताना स्थानिक मच्छीमारांनी देखील सफाई कामगारांसोबत किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविली. जलप्रदूषण रोखण्यासह किनारा स्वच्छ ठेवावा असे पालिकेने नागरिकांसह पर्यटकांना आवाहन केले आहे.
पावसामुळे समुद्राला येत असलेल्या उधनाच्या भरतीतून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येत आहे. हा किनारा नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने याठिकाणी कायमस्वरूपी सफाई कामगारांसह अत्यावश्यक वाहने वा यंत्रे कायमस्वरूपी तैनात करावेत.
-नगरसेविका शर्मिला बगाजी
हेही वाचा