

ठाणे : 'कैसे हराया' म्हणत संपूर्ण समाज माध्यमांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठाणे महापालिकेच्या मुंब्रा भागातील नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनिस शेख यांना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. युनूस शेख यांची शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
युनूस शेख यांना शिवसेनेत महत्वाचे हे पद दिल्याने मुंब्र्याच्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले असून शेख यांना शिवसेनेत पद दिल्याने शिवसेनेचे हे ढोंगी हिंदुत्व असल्याचा आरोप उबाठाकडून करण्यात आला आहे.
या सर्व प्रक्रियेला सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर असलेली टांगती तलवार याचीही पार्श्वभूमी असल्याने या राजकीय घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युनूस शेख यांनी मात्र आपण एमआयएममध्येच असल्याचा दावा केला आहे. सहर शेख या एमआयएमच्या याच त्या नगरसेविका आहेत. ज्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची भाषा केली होती. मात्र आता त्यांचे वडील युनूस शेख यांनी शिवसेनेत महत्वाचे पद घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या ‘कैसे हराया’ आणि ‘मुंब्रा हिरवा करणार’ या वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता त्यांच्या वडिलांना शिंदेंच्या शिवसेनेत महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. युनूस शेख यांची शिवसेना अ. भा. केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली.
नियुक्तीपत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात येत असल्याचा उल्लेख आहे. मात्र, या नियुक्तीनंतर युनूस शेख यांनी आपण एमआयएम मध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सहर शेख यांच्या विजया- नंतरच्या वक्तव्यांवरून शिंदेंच्या शिवसेनेसह हिंदुत्ववादी राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ‘मुंब्रा हिरवा करणार’ या विधानाचा धार्मिक आणि राजकीय अर्थ लावत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. आता त्याच सहर शेख यांच्या वडिलांना शिंदेंच्या शिवसेनेत पद मिळाल्याने या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
युनूस शेख यांनी आपल्या नियुक्तीमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, केबल व इंटरनेटचा व्यवसाय ४० वर्षांपासून करत असून, या व्यवसायाशी संबंधित संघटनेशी जोडले जाण्याची त्यांची इच्छा होती. अ. भा. केबल सेना ही संघटना आनंद दिघे यांच्या काळापासून असल्याचे सांगत त्यांनी या संघटनेशी आपले पूर्वीपासून संबंध असल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे व आपल्या वडिलांचे ४५ वर्षांपासून संबंध असल्याचा उल्लेख करत शेख म्हणाले, शिंदे यांनी नेहमीच त्यांच्या कुटुंबाला सहकार्य केले असून, अडचणीच्या काळात ते पाठीशी उभे राहिले. आपल्याला पद देण्यात आले असून, त्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, नियुक्तीपत्रावर शिवसेनेचा उल्लेख असणे किंवा शिवसेनेचे चिन्ह असलेला गमछा परिधान करणे, याचा अर्थ आपण पक्षप्रवेश केला असे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मी एमआयएममध्येच राहणार; अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या संपूर्ण घडामोडीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युनूस शेख यांनी आपण एमआयएम मध्येच असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. एमआयएममध्येच राहून जनतेची कामे करणार असे सांगताना, केबल सेनेतील पद व्यवसायाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला. जनतेची कामे करण्यासाठी आवश्यक निधी मिळवताना शिवसेना किंवा भाजपकडेही जावे लागले, तरी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘हे ढोंगी हिंदुत्व’ ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा
या नियुक्तीवरून ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिस गाढवे यांनी सहर शेख यांच्या ‘कैसे हराया’ आणि ‘मुंब्रा हिरवा करणार’ या वक्तव्यांचा संदर्भ देत शिंदे गटाच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सहर शेख यांच्या वक्तव्यांवरून शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्यांच्याच वडिलांना शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधित संघटनेत पद देण्यात आले आहे.
युनूस शेख आपल्या विधानांवर ठाम असल्याचे सांगत असतील, तर त्यांना मिळालेल्या पाठबळाचा राजकीय अर्थ काय, असा सवाल गाढवे यांनी उपस्थित केला. एमआयएमशी संबंधित व्यक्तींना पदे देण्याच्या भूमिकेवरून शिंदेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व राजकीय सोयीपुरते असल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून इतर पक्षांवर टीका करणाऱ्यांनी आता या नियुक्तीचे स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.