

Bahadarpura River Accident
नांदेड : नांदेडहून जांब मुखेडकडे जाणारी कार बहादरपुरा पुलावरून नदीत कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि.१६) पहाटे दोनच्या सुमारास घडली. या कारमध्ये पती-पत्नी प्रवास करत होते. अपघातानंतर पती कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले; मात्र पत्नीचा अद्याप शोध लागलेला नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार बहादरपुरा पुलावरून जात असताना अचानक नदीत कोसळली. अपघातानंतर कार पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत पती स्वतःचा जीव वाचवून बाहेर आले, तर पत्नी कारसह पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासूनच नदीपात्रात पत्नीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, सकाळी नदीत बुडालेली कार बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, कारमधील महिलेचा अद्याप शोध लागलेला नसल्याने शोधमोहीम सुरू आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कार पुलावरून नदीत कशी कोसळली, याचा तपास पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत आहे. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.