

बदलापूर : विविध सामाजिक आणि राजकीय विषयावर आंदोलन छेडणाऱ्या व बदलापूर शाळेतील बालिकांवर अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात प्रकाश झोतात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापूर शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी मंगळवारी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मनसे आणि राज ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
मनसेच्या रणरागिणी म्हणून संगीता चेंदणकर या बदलापूर आणि परिसरात परिचित होत्या. त्यांनी महिलांच्या विषयावर व बदलापुरातील असामाजिक तत्त्वावांविरोधात अनेक आंदोलन छेडली आहेत. त्याला अनेक वेळा यश आलं होतं. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस त्यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक ही लढवली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या पक्षश्रेष्ठींवर प्रचंड नाराज होत्या.
तसेच महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळणार होती. मात्र स्थानिक एकामुळे आपल्याला ही उमेदवारी मिळाली नाही असा आरोप करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे यापूर्वी अनेक वर्ष आपण संघर्षवत राजकीय प्रवास केला आहे. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शहराच्या सामाजिक विषयांसह विकासात्मक धोरणातही आपण सहभागी होऊन कॅप्टन आशीष दामले यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने काम करू असा विश्वास संगीता चंदणकर यांनी या प्रवेशानंतर बोलताना व्यक्त केला.
संगीता चेंदवणकर यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सामाजिक लढ्याला आणखी यश मिळेल आणि संगीता चेंदवणकर यांचा पक्षात योग्य तो मानसन्मान राखला जाईल, असे दामले म्हणाले.