

नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसर पावसाळ्यात पुन्हा एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, वाहणारे ओढे आणि मनमोहक निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच मुंबई परिसरातून दररोज शेकडो पर्यटक येथे दाखल होत आहेत. शहराच्या गजबजाटापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा परिसर पावसाळी पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण बनला आहे.
श्री मलंगगड परिसरातील नदीपात्र, नैसर्गिक धबधबे आणि हिरवागार डोंगराळ भाग पर्यटकांना विशेष आकर्षित करत आहेत. विशेषता कुशिवली परिसर आणि श्री मलंगगड फ्युनिक्युलर मार्गालगतचा धबधबा येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबासह अनेक जण पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येथे येत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक अर्थचक्रालाही मोठी चालना मिळत आहे. रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या भाजलेल्या मक्याच्या गाड्या, वडा-पाव, गरम भजी, चहा, शीतपेय तसेच अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल होत आहे. याशिवाय स्थानिक युवकांना वाहनतळ आणि इतर पूरक व्यवसायांमधूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटन स्थानिकांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.
मात्र या सकारात्मक चित्रासोबत सुरक्षिततेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. नदीपात्र आणि धबधब्यांच्या परिसरात आवश्यक सुरक्षाव्यवस्था, इशारा फलक, संरक्षक कठडे, प्रशिक्षित बचाव पथक किंवा आपत्कालीन सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पाण्यात बुडणे किंवा पाय घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने पर्यटकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही धोकादायक ठिकाणी प्रवेश बंदीचे आदेश लागू केले आहेत. स्थानिक पोलिसांची पथक देखील पर्यटकांना माघारी पाठवत आहेत.तरीही अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या भागात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देतानाच सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि पर्यटक यांनी सामूहिक जबाबदारीची भूमिका घेतल्यास श्री मलंगगड परिसर पावसाळी पर्यटनाचे अधिक सुरक्षित आणि आकर्षक केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो.