Ratnagiri News : लांजातील अंडरपासच्या मागणीला राजकीय बळ

किरण सामंतांच्या ग्वाहीनंतर लांजातील आंदोलन स्थगित; महामार्गावर नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन
Ratnagiri News
लांजातील अंडरपासच्या मागणीला राजकीय बळ
Published on
Updated on

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलामुळे दुभंगलेल्या लांजा शहरातील नागरिकांच्या अंडरपासच्या मागणीला अखेर राजकीय पातळीवर बळ मिळाले आहे. साटवली तिठा ते कुणबी पतसंस्था दरम्यान अंडरपास उभारण्याच्या मागणीसाठी २५ जून रोजी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या लांजा तालुका संघर्ष समितीने आमदार किरण सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे. शहरातील वाहतूक, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि महामार्गामुळे निर्माण झालेल्या विविध समस्या सोडवण्याची ग्वाही आमदार सामंत यांनी दिल्याने आंदोलनाचा पवित्रा मागे घेण्यात आला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणांतर्गत लांजा शहरातून उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी त्याच्या रचनेमुळे शहर दोन भागांत विभागले गेले आहे. विशेषतः साटवली तिठा ते कुणबी पतसंस्था या वर्दळीच्या परिसरात अंडरपासची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी दिवसभर मोठी वर्दळ असतानाही सुरक्षित मार्गाचा विचार न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

लांजा तालुका संघर्ष समिती आणि स्थानिक नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे अंडरपासची मागणी सातत्याने लावून धरली होती. ऑगस्ट २०२४ पासून विविध निवेदने, बैठका आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर समितीने २५ जून रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या भूमिकेमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले होते.

नागरिकांच्या तीव्र भूमिकेची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी १९ जून रोजी महामार्ग प्रशासन आणि नागरिक यांच्यात विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. उड्डाणपुलाचे डिझाइन करताना अंडरपासचा विचार का झाला नाही, समन्वय समितीच्या मागण्यांवर कार्यवाही का झाली नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली मुदत का पाळली गेली नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत महामार्ग प्राधिकरणाचे धोरण काय आहे, तसेच सर्व्हिस रोड आणि भूसंपादन भरपाईची कामे कधी पूर्ण होणार, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी केली.

बैठकीदरम्यान आमदार सामंत यांनी नागरिकांच्या भावना आणि अडचणी गांभीर्याने घेत अंडरपासचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. जनतेच्या सहकार्याने आणि प्रशासनाशी समन्वय साधून शहरातील समस्या सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर संघर्ष समितीने आंदोलनाला तूर्तास स्थगिती देत प्रशासनाला प्रश्न सोडविण्यासाठी आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या बैठकीला न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयवंत शेट्ये, महम्मद रंगाची, प्रदीपकुमार बेंडखळे, माजी सरपंच प्रकाश लांजेकर, माजी नगराध्यक्षा संपदा वाघदरे, संघर्ष समितीचे प्रमुख चंद्रकांत परवडी, नाना मानकर, अल्लाउद्दीन नेवरेकर, समाजवादी नेते बबन मयेकर, दिलीप चौगुले, सूर्यकांत लांजेकर, काका शिंदे, शिवाजी कोत्रे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अंडरपासचा प्रश्न हा केवळ वाहतुकीचा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित असल्याने प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता लांजावासीयांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news