

पोलादपूर : पोलादपूर–वाई–महाबळेश्वर–सुरूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात पावसाळा सुरू होताच धोक्याची घंटा पुन्हा एकदा वाजू लागली आहे. एका बाजूला दरडी कोसळणे, मातीचा ओसरा आणि झाडे रस्त्यावर पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दुसऱ्या बाजूला घाटातील अनेक अतिधोकादायक वळणांवर आजही संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांनंतरही आवश्यक सुरक्षा उपाययोजना रखडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बावली टोक ते दाभील टोक या दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यालगत शेकडो फूट खोल दऱ्या आहेत. या परिसरात यापूर्वी अनेक गंभीर अपघात झाले असून, दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेची आठवण अद्याप ताजी आहे. तर नुकताच सातारा येथील युवकांचा अपघात होऊन आठ जण मृत्यमुखी पडले मात्र, त्या दुर्घटनास्थळासह अनेक धोकादायक ठिकाणी आजही मजबूत संरक्षक कठडे किंवा बॅरिकेड्स उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात एखादी चूक थेट जीवावर बेतू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात डोंगर कापण्यात आला आहे. त्यामुळे डोंगराचा भाग सैल झाला असून, यंदा दरडी कोसळण्याचा धोका अधिक वाढल्याचे जाणकार सांगत आहेत. अनेक ठिकाणी गटारे खोदण्यात आली असली, तरी डोंगराच्या बाजूने योग्य भराव न केल्याने पावसाचे पाणी थेट उतारावरून वाहत आहे. परिणामी मातीचा ओसरा वाढून दरडी कोसळण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे.
दरड कोसळल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तातडीने मोकळा केला जातो. मात्र, दरड कोसळल्यानंतरची कारवाई महत्त्वाची की दरड कोसळूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. कारण मध्यरात्री किंवा पहाटे अचानक वाहनावर दरड कोसळल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
चिरेखंड येथील राखीचा टोक परिसरातील ओव्हाळाजवळ पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक पाईप अद्याप टाकण्यात आलेले नाहीत. याच मार्गाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थी रोज ये-जा करतात. गेल्या वर्षी पाण्याच्या प्रवाहात एक विद्यार्थी वाहून जाता जाता बचावला होता. याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे यंदा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
दरडी, खोल दऱ्या, संरक्षक कठड्यांचा अभाव आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे आंबेनळी घाटातील प्रत्येक प्रवास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पोलादपूर आपत्ती व्यवस्थापन समिती, संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी तातडीने संयुक्त पाहणी करून धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे, बॅरिकेड्स, इशारा फलक, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था आणि २४ तास आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, ती होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मंगळवारी सायंकाळी तीन ठिकाणी मातीचा ओसरासह झाड पडल्याच्या घटना घडल्या होत्या. सुमारे तीन तासानंतर वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली. गेली दोन वर्षे या मार्गाने रुंदीकरणचे काम सुरू आहे. एकीकडे डोंगर कटींग करत माती व दगड दरीत टाकायचे काम चालू असल्याने पावसाळ्यात कोसणारी माती झाड सुद्धा जेसीबीच्या साहयाने दरीत टाकण्यात येत आहे.