

डोंबिवली : वाहतूकदार, नोकरदार, विद्यार्थी, वाहनचालक, प्रवासी आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यात आतापर्यंत कुणालाही यश आलेले नाही. या महामार्गावर एमएमआरडीए/वाहतूक नियंत्रण यंत्रणा एखाद्या सुस्त पडलेल्या अजगरासारखी झाली आहे.
या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविणार कोण ? असा सवाल करत सुस्त पडलेल्या या अजगराला उठविण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.
वाहतूक कोंडीचा नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, जेष्ठ नागरिक, वाहनांचे चालक, प्रवासी, रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे.
कल्याण-शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच नवी मुंबईकडून येताना महापे रोड आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाय जंक्शन ते कल्याण फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्याचा प्रवाशांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण-शिळ महामार्गावरून नवी मुंबई औद्योगिक वसाहतीकडे, तसेच मुंबईकडे नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग ये-जा करत असतो. या महामार्गावर रूग्णवाहिका देखील तासन् तास अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
या महामार्गावर दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्यामुळे व्यापार/व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कल्याण-शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच महापे रस्ता आणि वाय जंक्शन ते कल्याण फाट्यापर्यंतची वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
सुभाष भोईर यांनी वाहतूक कोंडी, वेळ आणि इंधनाचा अपव्यय, एकच जागी तासन् तास थबकून धूर ओकणाऱ्या वाहनांमुळे परिसरात होणारे जीवघेणे प्रदूषण, आदी मुद्द्यांवर भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी ऑन द स्पॉट संबंधित विभागाला तात्काळ सूचना देऊन केलेल्या उपाययोजनांसह केलेल्या कार्यवाहीचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.