

डोंबिवली : नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या कल्याण-शिळ महामार्गावरील ईगो बारचा इगो पोलिसांनी एका झ्टक्यात उतरवून टाकला आहे. काटई गावाजवळ मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मे. हॉटेल टुरिस्ट अँड बार तथा ईगो बारवर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकातील कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी गणेशोत्सवाच्या धामधुमीत मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली.
या धाडीत तोकड्या कपड्यात अश्लिल आणि विभत्स अंगविक्षेप करत ग्राहकांची माथी भडकावणाऱ्या १८ बारबाला तथा कथित नृत्यांगनांसह बारचा परमिटधारक, चालक, मॅनेजर, वेटर्स आणि नोटा उधळून नृत्यांगनांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणाऱ्या २९ ग्राहक अशा एकूण ५६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असतो. तेथे अश्लील आणि बीभत्स गाणी गात बारबाला नाचतात, अशा तक्रारी वाढल्या होत्या. उपायुक्त झेंडे यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली. ईगो बारवर कारवाई करण्याची जबाबदारी मानपाडा पोलिसांऐवजी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांवर सोपविली. उपायुक्तांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि पथकाला काटई गावच्या हद्दीतील ईगो बारवर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार सपोनि प्रशांत आंधळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ईगो बारमध्ये अचानक एन्ट्री केली. त्यावेळी तोकड्या कपड्यात नाचणाऱ्या १८ कथित आढळून आल्या. त्यातील काही ग्राहक बारबलांवर नोटांची उघळण करताना आढळून आल्या.
यावेळी पोलिसांनी १८ बारबाला, २९ ग्राहक, ५ वेटर, सदर बारचा मालक संतोष बळीराम पावशे (फरार आरोपी), चालक सतीश आनंद शेट्टी (फरार आरोपी), मॅनेजर रविंद्रा श्रीनिवास बगेरा (५७), कॅशियर शिवकुमार सिध्दाराम बिरासदार (३२), म्युझिक ऑपरेटर रोहन विजय शेलार (३०) अशा ५६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर चव्हाण करत आहेत. या कारवाईत १३ हजार ७३० रूपयांच्या रोकडसह वाद्यवृंद, लाईट्स असा २ लाख ३६ हजार ७३० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.