

डोंबिवली : मेट्रो प्रकल्प उभारणीच्या कामासाठी लावलेल्या पत्र्यांमुळे कल्याण-शिळ महामार्गावर बुधवारी (दि.26) रोजी सकाळी वाहतुकीची कोंडी झाली. मानपाडा ते काटई दरम्यान एक-दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहनांमध्ये नोकरदार, शाळेच्या बसगाड्या, मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेले पालक अडकून पडले होते. त्यातच सायारन वाजवत निघालेल्या काही अँब्युलन्स देखिल या कोंडीत अडकल्या होत्या. शाळेत, तसेच कामावर जाण्याच्या वेळेत ही कोंडी झाल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.
मेट्रोच्या कामासाठी मेट्रो कंपनीने रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम आणि पाया उभारणीची कामे सुरू केली आहेत. या कामाचा त्रास या रस्त्याच्या दुतर्फा धावणाऱ्या वाहनांना होऊ नये यासाठी रस्त्याच्या मधल्या भागात दोन्ही बाजूने ठेकेदाराकडून संरक्षित पत्रे उभे केले जातात. या पत्र्यांमुळे मेट्रोच्या कामाला वाहतुकीचा अडथळा येत नाही. मंगळवारी (दि.25) रोजी रात्री मानपाडा परिसरात मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी पत्रे लावण्यात आले. हे पत्रे मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा येत होता. रात्रीच्या सुमारास वाहनांची संख्या कमी असल्याने पत्र्यांच्या जवळून वाहन चालकांनी कसाबसा मार्ग काढला.
बुधवारी (दि.26) रोजी सकाळी मात्र याच नव्याने पत्रे लावण्यात आलेल्या भागातून वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीने उच्चांक गाठला. मोठ्या प्रवासी बसेस आणि अवजड वाहने या भागातून पुढे नेणे चालकांना अवघड जात होते. त्यामुळे नव्याने पत्रे लावलेल्या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. एका मार्गावर कोंडी सुरू होताच वाहन चालकांनी विरुध्द मार्गाने वाहने वळवून प्रवास सुरू केला. त्यामुळे दोन्ही बाजुच्या मार्गांवर मानपाडा ते सोनारपाडा भागात वाहतूक कोंडी झाली. मेट्रोच्या पत्र्यांची डोकेदुखी सुरू असताना एक वाहन रस्त्यावर मध्येच बंद पडले. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची डोकेदुखी वाढली.
कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी तातडीने क्रेन बोलावून बंद पडलेले वाहन सहकाऱ्यांच्या मदतीने बाजुला ओढून घेतले. वाहतुकीला अडथळा ठरणारे मेट्रोचे पत्रे संबंधित ठेकेदाराला काढण्यास सांगितले. पत्रे काढल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. तोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. कल्याण-डोंबिवलीहून पलावा, शिळफाटा भागात जाणाऱ्या शाळकरी मुलांसह कामावर निघालेल्या नोकरदार चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बसला होता. कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस रस्तो रस्ती झालेली कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होते. सकाळी झालेली कोंडी हळूहळू कमी करण्यात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना यश आले.
कल्याण-शिळ महामार्गावर एकीकडे सुरू असलेल्या मेट्रोचे काम, तर दुसरीकडे संथगतीने सुरू असलेली पलावा जंक्शन जवळील पुलाचे काम या दोन्ही कामांमुळे महामार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह प्रवासी आणि वाहन चालकांना वाहतूक कोंडीसह प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहनांना प्रवेशाच्या वेळा पाळण्याच्या सूचना वाहतूक नियंत्रण विभागास द्याव्यात, याकडे मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले. सद्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामात अजिबात शिस्त नाही. ज्या प्रकारे काम सुरू आहे तेथे वाहतूक कोंडी होणे अपरिहार्य आहे. काम करणाऱ्यांनी रस्ता व्यवस्थित सोडलेला नाही. शेतकऱ्यांना जागेचा मोबदला दिलेला नाही, त्यामुळे काही ठिकाणी काम रखडले आहे. नियोजन शून्य कारभार यातून स्पष्ट दिसत आल्याचे राजू पाटील म्हणाले.
कल्याण-शिळ महामार्गाला पर्यायी रस्ते तयार करावेत, अशी आमची मागणी आहे. हे पर्यायी रस्ते नसल्याने आज शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात अँब्युलन्स अडकून पडतात. मेट्रोच्या कामामुळे विद्यार्थी, रूग्णांसह प्रवासी आणि वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे पर्यायी रस्ते बांधून घ्या, अशा सूचना माजी आमदार राजू पाटील यांनी सरकारकडे केल्या.
कल्याण-शिळ महामार्गावर मानपाडा भागात मेट्रोच्या कामासाठी बुधवारी (दि.26) रोजी रात्री लावण्यात आलेले पत्रे वाहतुकीला अडथळा येत होते. पत्रे लावलेल्या भागातून वाहने निघणे अवघड जात होते. त्यामुळे या भागात कोंडी झाली होती. या रस्त्यावर एक वाहनही बंद पडले होते. त्यामुळे काही वेळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मेट्रोचे पत्रे आणि बंद पडलेले वाहन बाजुला करण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले.