

नेवाळी : रस्त्याच्या कामात बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकर्याने रस्ता बंद केला आहे. कल्याण-शिळ रस्त्याला 14 गावांशी जोडणारा उत्तरशिव खिडकाळी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे 14 गावातील नागरिकांना मोठा वळसा घालून कल्याण शिळ रस्ता गाठावा लागत आहे. मोबदल्याची आश्वासन देऊन सुद्धा न दिल्याने शेतकर्याने आक्रमक पवित्रा घेत थेट रस्त्याच्या मध्येच खड्डा खोदून 14 गावांची वाट बंद केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील 14 गावांना कल्याण शिळ रस्त्याशी जोडणार्या उत्तरशिव खिडकाळी रस्ता बंद झाला आहे. शेतकर्यांनी मागील दीड महिन्यापासून मोबदल्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याने मध्येच खड्डा खोदून वाहतूक बंद केली आहे. दरम्यान या बंद असलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे शासनाकडून डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र खिडकाळी गावाजवळ एका शेतकर्याच्या मालकीच्या जागेतून हा रस्ता इतर गावासाठी जाण्यासाठी जोडला गेला होता.
या जमिनीचा मोबदला सरकारकडून शेतकर्याला मिळाला नसल्यामुळे सदर ठिकाणी शेतकर्याने रस्ता खोदून ठेवला असल्याने खिडकाळी, देसाई, पडले, उत्तरशिव, नागाव, नारीवली, दहिसर, वडवली, घेसर, डायघर व इतर ठिकाणी जाण्या-येण्यासाठी नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे.
या संदर्भात लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांनी सदर प्रकरणी वेळीच लक्ष देऊन शासनाकडून शेतकर्याला त्याच्या जमिनीचा मोबदला देऊन नागरिकांना याबाबत दिलासा द्यावा, अशी मागणी आगरी सेनेचे भालचंद्र म्हात्रे यांनी केली आहे.