Ganpati Visarjan Noise Pollution: गौरी गणपती विसर्जनामध्ये ढोल-ताशा, बँजोचा दणदणाट; आवाजाची पातळी १०५ डेसिबलपर्यंत

तलावपाळी आणि वागळेमध्ये सर्वाधिक आवाजाची पातळीची नोंद झाली असून यावर्षी फटाक्यांची आतषबाजी देखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे समोर आले आहे.
Ganpati Visarjan Noise Pollution
Ganpati Visarjan Noise PollutionPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाण्यात शनिवारी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट कमी झाला असला तरी, ढोल ताशांचा तसेच बँजोचा दणदणाट मात्र पाहायला मिळाला. यामुळे गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात आवाजाची पातळी ही १०५ डेसिबलपर्यंत पोहोचली होती, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दिली आहे.

तलावपाळी आणि वागळेमध्ये सर्वाधिक आवाजाची पातळीची नोंद झाली असून यावर्षी फटाक्यांची आतषबाजी देखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे समोर आले आहे.

शनिवार गौरी-गणपती विसर्जनाच्या मिरवणुका ठाणे शहरातील विविध मार्गांवरून निघाल्या. या मिरवणुकांमध्ये पारंपरिकढोल-ताशांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. राम मारुती रोड येथे रात्री साडेनऊ वाजता ८५ ते ९० डेसिबल, पाचपाखाडी येथे रात्री १० वाजता ९० ते ९५ डेसिबल, तर टीएमसी कचराळी सर्कल येथे रात्री साडेदहा वाजता ९० ते ९५ डेसिबल ध्वनीची नोंद करण्यात आली.

Ganpati Visarjan Noise Pollution
Khpoli Crime News: मखर सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव; मुलाला अटक

रात्री ११ वाजता आयसीआयसीआय बँकेजवळ ध्वनीची पातळी १०० ते १०५ डेसिबलपर्यंत पोहोचली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता तलावपाळी परिसरातही १०० ते १०५ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे नागरिकांना मोठ्या आवाजाचा सामना करावा लागला.

राम मारुती रोडवर ढोल-ताशांचा गजर

राम मारुती रोडवर अनेक विसर्जन मिरवणुका होत्या. बहुतांश मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा आणि बॅन्जोचा वापर करण्यात आला.यावेळी सुमारे ५० टक्के मिरवणुकांमध्ये ध्वनिवर्धकांचा वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्याचप्रमाणे पाचपाखाडी परिसरामध्‍ये तर ढोल-ताशांसोबत डीजे आणि ध्वनिवर्धकांचाही वापर सुरू असल्याचे दिसून आले.

डीजेची जागा आता ढोल-ताशांनी घेतली

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा डीजेचा वापर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत असले, तरी त्यामुळे ध्वनीप्रदूषणात फारशी घट झाल्याचे चित्र नाही. डीजेच्या जागी मोठ्या संख्येने ढोल-ताशा पथके सहभागी झाली आहेत.

त्यात मोठ्या लांबट धातूच्या दंडगोलाकार वाद्यांचीही भर पडली आहे. ढोल-ताशे, ध्वनिवर्धक आणि या धातूच्या वाद्यांचा एकत्रित आवाज मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश ठरत असल्याचे निरीक्षण आहे.

Ganpati Visarjan Noise Pollution
Raigad Teacher: ३५१ शिक्षक भरले, तरी २० शाळांमध्ये एकही शिक्षक नाही! रायगडमधील सहा तालुक्यांचा प्रश्न कायम

पोलिसांमुळे वाहतूक सुरळीत; ध्वनीप्रदूषणावरील कारवाईचे काय?

विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यामुळे मिरवणुकांच्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्था तुलनेने सुरळीत राहिली. मात्र, ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले. कर्णकर्कश आवाजाच्या वाढत्या पातळीवर भाष्य करताना डॉ. बेडेकर यांनी उपरोधिक टिप्पणी केली.

‘कानठळ्या बसणे’, ‘कानाचा पडदा फाटणे’ या मराठी संज्ञांचा अनुभव घ्यायचा असेल तर विसर्जन मिरवणुकीत जरूर सहभागी व्हावे, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news