

शरद निकुंभ
रायगड: रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५१ उपशिक्षकांची भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमासाठी ३४०, तर उर्दू माध्यमासाठी ११ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे.
मात्र, या भरती प्रक्रियेत उरण, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि सुधागड या सहा तालुक्यांचा समावेश न झाल्याने संबंधित तालुक्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.नव्या भरतीमुळे शिक्षकांची कमतरता असलेल्या काही भागांना दिलासा मिळाला असला, तरी या सहा तालुक्यांतील रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे.
विशेषतः शून्य शिक्षकी शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही शाळांमध्ये लगतच्या केंद्र शाळांमधून शिक्षक पाठवून अथवा तात्पुरत्या व्यवस्थेद्वारे अध्यापन सुरू ठेवावे लागत आहे.
जिल्ह्यात अद्याप मराठी माध्यमाची १ हजार १३९, तर उर्दू माध्यमाची ७८ शिक्षक पदे रिक्त आहेत. नव्या भरतीनंतरही सुधागडमध्ये ५४, खालापूरमध्ये ३२, पेणमध्ये ९३, कर्जतमध्ये ७२ आणि उरणमध्ये ४० पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येते. पनवेल तालुक्याचाही या भरतीत समावेश झालेला नाही.
या सहा तालुक्यांमध्ये जवळपास २० शाळा शून्य शिक्षकी असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर परिणाम होत असून, तात्पुरत्या व्यवस्थेवर शिक्षणाचा गाडा सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांकडून शिक्षक भरतीत सर्व तालुक्यांना समान संधी देण्याची मागणी होत आहे.शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असतानाच कार्यरत शिक्षकांच्या इतरत्र बदल्या होत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे.
शिक्षक भरती करताना प्रशासनाने सर्व तालुक्यांचा समतोल विचार करणे आवश्यक होते. विशिष्ट तालुके वगळून केवळ काही भागांतच भरती करणे अन्यायकारक आहे. शून्य शिक्षकी शाळांना प्रथम प्राधान्य देऊन शिक्षक न दिल्यास ग्रामीण भागातील शाळा कायमच्या बंद पडण्याचा धोका आहे. खांडपोली येथील सरपंचांनी तर जिल्हा परिषद कामथेकरवाडी शाळेत शिक्षक भरण्यात यावे यासाठी थेट शिक्षण मंत्री यांना तक्रारी निवेदन दिले आहे.
- दिपक पवार, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वाघोशी
ज्या तालुक्यांमध्ये शिक्षकांची पदे अत्यंत मोठ्या प्रमाणावर रिक्त होती, तिथे या टप्प्यात प्राधान्याने भरती करण्यात आली आहे. शून्य शिक्षकी शाळांमध्ये शिक्षक देण्यात आले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमधील रिक्त जागा या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत तातडीने भरल्या जातील. तसेच काही जागा समायोजनाने भरल्या जातात.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड