

सापाड : डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी रिल्स स्टार सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती आणि सुरेंद्र पाटील यांची मोठ्या प्रमाणात बदनामीही झाली होती. मात्र न्यायालयीन सुनावणीत या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
मात्र न्यायालयात सुनावणीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि सुरेंद्र पाटील यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. या संबंधातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर रागाच्या भरात फिर्यादीने डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
फिर्यादी महिलेनेच महत्त्वाची कबुली दिली. तिच्या साक्षीत तिने असा कोणताही बलात्काराचा प्रकार घडला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. दोघांमधील वैयक्तिक वाद आणि भांडणातून रागाच्या भरात तक्रार दाखल केल्याचेही तिने स्पष्ट केले. फिर्यादीच्या या कबुलीनंतर न्यायालयाने प्रकरणातील परिस्थिती आणि साक्षीचा विचार करून सुरेंद्र पाटील यांची निर्दोष सुटका केली.
दरम्यान, सुरेंद्र पाटील यांचे वकील अभिषेक पालवे यांनी सांगितले की, न्यायालयात सत्य समोर आल्यामुळे त्यांच्या क्लायंटला न्याय मिळाला असून सुरुवातीपासूनच हा वाद वैयक्तिक मतभेदातून निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला होता.