

बदलापूर : पंकज साताळकर
अमेरिका-इराण युद्धाचा मोठा फटका भारतातल्या छोट्या व्यापाऱ्यांना बसला आहे. कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे छोटे उद्योजक पुरते हवालदिल झाले आहेत. बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड हे दरवर्षी आपल्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दीड ते दोन लाख गणेशमूर्ती तसंच पूजेचं साहित्य 25 हून अधिक देशांमध्ये पाठवत असतात. मात्र युद्धामुळे पॅकिंगसाठी आवश्यक असलेलं फोम उपलब्ध होत नसल्याने परदेशात गणेशमूर्ती कशा पाठवायच्या असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. महत्त्वाचं म्हणजे या युद्धामुळे निर्यातही महागली आहे.
शेकडो कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. ग्राहकांपर्यंत माल केव्हापर्यंत पोहोचेल, त्याची कोणतीच खात्री व्यापाऱ्यांना देता येत नाही. परदेशातील ग्राहकांनी या सर्व ऑर्डर नोव्हेंबर-डिसेंबर मध्येच बुक केल्या आहेत. त्यामुळे एकीकडे कच्च्या मालाची कमतरता, दुसरीकडे वाढलेली महागाई आणि तिसरीकडे युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता या तिहेरी कात्रीत निमेश जनवाड यांच्यासारखे शेकडो छोटे उद्योजक सापडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी निमेश जनवाड यांनी केली आहे.
बदलापुरातून सुमारे दीड लाखाहून अधिक गणेश मूर्ती या जगभरातील 25 अधिक देशांमध्ये जात असल्यामुळे येथे शेकडो स्थानिकांना रोजगार मिळतो. त्यामुळे जर हे युद्ध आणखीन लांबलं आणि त्याचा फटका या उद्योगाला बसला तर गणेशमूर्तींच्या घडवणुकीपासून ते रंगकाम व त्या विदेशात पाठवण्यापर्यंत असलेल्या साखळीतील अनेकांवर बेरोजगारीचा सावट येणार आहे. फक्त गणेश मूर्तीच नाही तर दिवाळी व इतर सजावट साहित्याची ही बदलापुरातून मोठ्या प्रमाणात परदेशात पाठविल्या जातात त्यामुळे वर्षभर सुरू असलेल्या या कामाला आता सध्या ब्रेक बसला आहे.
व्यावसायिक वापराच्या सिलिंडरवर राज्य शासनाने घातलेल्या बंदीमुळे अनेक लघुउद्योग ठप्प पडले आहेत. तसेच लघुउद्योगांना लागणारा कच्चामाल आणि गणपती व इतर तत्सम पदार्थ पॅकेजिंग साठी लागणारा फॉर्म बनवण्यास सध्या अडथळे येत आहेत. मार्केटमध्ये उपलब्ध असलेला कच्च्या मालाच्या किमतीही यामुळे प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी आणि त्याआधी घेतलेल्या ऑर्डर्स आता पूर्ण होऊन निर्यातीची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच युद्ध सुरू झाल्यामुळे निर्यात उद्योगाला मोठा फटका बसेला आहे. त्यातून आमच्यासारख्या छोट्या उद्योजकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निमेश जनवाड यांनी सांगितले.