डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : जर्मनीत शिक्षण घेण्यास गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा विसर न पडू देता भारतीय संस्कृती जर्मनीत देखील जपण्याचे कार्य सुरू केले आहे. कल्याणमधील प्रतिक उतेकर या विद्यार्थ्याचा तेथील ढोल ताशा पथकात समावेश असून गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ढोल-ताशाचे वादन केले.
महाराष्ट्रात गावोगावी दिसणारी ढोल-पथके आता जर्मनीतही दिसू लागली आहेत. कल्याणमधील प्रतिक उतेकर हा जर्मनीत मॅकेनिकल इंजिनियर आहे. जर्मनीत या विषयावर तो उच्च शिक्षण घेत आहे. त्याच्या मित्र परिवाराने जर्मनीमधील स्थानिक प्रशासनाची परवानगी घेतली. त्यानंतर सर्वांनी गेले काही महिने ढोल वाजविण्याचा सराव केला. परदेशात यावर्षी अतिशय भक्तिभावाने ही मंडळी गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याबरोबरच अतिशय उत्साहात व पारंपारिक पद्धतीने भगवे झेंडे, पालख्या घेऊन, मिरवणुका काढून ढोल पथकातील तरुण-तरुणींनी आपली कला सादर केली. याचा मनमुराद आनंद तेथील स्थानिक परदेशी नागरिकांनी घेतला. आपली संस्कृती परदेशात देखील जोपासणाऱ्या या सर्व भारतीय विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा