

अंबरनाथ: मनाचा पक्का निश्चय असेल तर कोणतीही गोष्ट कठीण नाही हे येथील बाल तबला वादक श्रेयस भोईर याने दाखवून दिले आहे. तब्बल सहा तास तबला वादन करून त्याने आपल्या नावे विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्याच्या या यशाचे सर्वच स्थरातून कौतून होत आहे.
लहानपणापासूनच श्रेयसला तबला वादनाचे अंग होते. त्याच्या अंगातील गुण ओळखून त्याला 2018 मध्ये अंबरनाथ मधील प्रसिद्ध तबला शिक्षक सुनील शेलार यांच्याकडे प्रशिक्षणास सुरुवात केली. त्याची जिद्द व मेहनत यामुळे श्रेयसने तबलावादनामध्ये चांगलीच भरारी घेतली आणि विविध स्पर्धांमध्ये त्याने प्राविण्य देखील मिळवले असल्याचे श्रेयसचे वडील दत्तात्रय भोईर सांगतात.
अलीकडेच श्रेयसने सलग 6 तास 16 सेकंद अखंड शास्त्रीय तबला वादन करून एक आगळावेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या वादनामध्ये पेशकार, कायदे, रेले, चलन, तुकडे, मुखडे, गत आणि चक्रदार यांचा समावेश आहे.
‘तबला’वादनातच करिअर करणार
विशेष म्हणजे, या वादनात एकही बोल पुन्हा न वाजवता संपूर्ण वादन सादर करण्यात आले आहे. या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. पूर्वी हा विक्रम 4 तासांचा असून तो कलकत्ता येथील एका वादकाच्या नावावर नोंदवलेला होता.
श्रेयसने 6 तास तबला वादन करून हा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवून नवा मानांकित विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम श्रेयसने आपले गुरु सुनील शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. त्याच्या या यशाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्रेयस सध्या दहावी इयत्तेत शिकत असून भविष्यात आपले करिअर तबला वादनामध्येच करणार असल्याचे त्याने सांगितले.