

सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: मुरुड तालुक्यात यंदा गतवर्षी पेक्षा उष्णतेचा पारा वाढला असुन गेल्या आठवड्यापासुन 32/33 अंशापर्यंत वाढल्याने नागरिक त्रासले आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी फणसाड अभयारण्यातील कर्मचारी सज्ज असले तरी या नबाबकालीन संरक्षित शिकार क्षेत्रातील निबीड जंगल असून आणि यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाले आहे.
वन्य जीवांना पिण्याच्या पाण्यासाठी 54 चौ. कि.मी. क्षेत्र परिसर पुरक आहे. फणसाड व विहूरची दोन धरणे तसेच 27 नैसर्गिक पाणवठे (गाणी) पैकी तब्बल 22 पाणवठे मुबलक पाणी साठ्याने युक्त आहेत. तथापि वन्य प्राण्यांसाठी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले असून सौर उर्जा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी वाहनाने पाण वढयांना पाणी पुरवठा करत असल्याची माहिती फणसाड अभयारण्यवनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांनी दिली.मुंबई पासुन 154 कि.मी. अंतरावर फणसाड अभयारण्य जैव वैविधतेने नटलेले आहे.
या वैविध्य पूर्ण अभयारण्यात 718 प्रकारची वनसंपदा असून 154पक्षी प्रजाती -53 कुटुंबांमधून50फुलपाखरांच्या प्रजाती -6 कुटूंबा मधून24सस्तन प्राणी - 10 कुटुबांमधून20सरिसृप -9 कुटूंबामधून13उभयचर -6 कुटुंबांमधून आढळून येतात.
उल्लेखनीय बाब म्हणजे रानगवे व रानकुत्रे ही अलिकडे दिसुन येत असल्याने निसर्गप्रेमींना जणू पर्वणीच ठरावी. सरासरी पर्जन्य 2800 ते 2900 मि.मी. इतक्या पावसाची नोंद घेण्यात आली असुन साग, निलगरी, किंजळ, जांभुळ, कुडा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन आदी वनौषधी वृक्षे ही मोठ्या प्रमाणावर आहेत.
पर्यटकांसाठी अभयारण्यात भटकंती साठी विशेष वाटा तयार केल्या असुन त्यामध्ये फणसाड गाण, सावर तलाव, सुपेगाव देवराई चा समावेश आहे. गाण अर्थात पाण्याचा साठा. अभयारण्यात 27 गाणी असुन यातील चिखल गाणी वर 24 तासात एकदा वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याचे निरीक्षकांनी सांगितले आहे. पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा या ठिकाणी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत.बैलगाडी सफरीसाठी स्थानिकांनी व्यवस्था केली आहे.
मुरुड फणसाड अभयारण्य परिसरात उष्णतेचा पारा 34/35 अंश इतका वाढला आहे . तथापि हा परिसर घनदाट जंगलाचा असल्याने प्राण्यांचे उन्हा पासुन सरंक्षण होते . पिण्याचे पाणी फणसाड धरण व विहूर धरणात मुबलक असुन नैसर्गिक पाणवठे सतत वाहत आहेत. तरीही शासनाकडून प्रत्येक चौकीत पाण्याचे घट पुरविण्यात आले आहेत . आमचे कर्मचारी वृंद पाण्याचे घट भरण्याचे काम नियमितपणे करीत आहेत .
- नितीन ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी फणसाड अभयारण्य